शरद पवार : जैतापूरला राष्ट्रवादीचा पाठिंबा
By Admin | Updated: April 12, 2015 00:48 IST2015-04-12T00:47:50+5:302015-04-12T00:48:01+5:30
विरोध करण्यापेक्षा सेनेने सत्तेतून बाहेर पडावे

शरद पवार : जैतापूरला राष्ट्रवादीचा पाठिंबा
नाशिक : एकीकडे केंद्रात व राज्यात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी एखादा प्रकल्प उभा राहत असेल तर, त्याला विरोध करायचा. त्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेवर केली आहे.
तसेच स्वस्त आणि राज्याच्या विकासासाठी आवश्यक असलेली वीज जैतापूर प्रकल्पातून मिळणार असेल तर, आमचे सरकारला सहकार्यच असेल, अशा शब्दात शरद पवार यांनी जैतापूर प्रकल्पाला राष्ट्रवादीचा पाठिंबाच असेल, असे सांगत एकप्रकारे पुन्हा एकदा शिवसेनेला एकटे पाडत भाजपाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.
तारापूर अणुप्रकल्पातून राज्याला स्वस्त व पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता वीज मिळते आहे. त्यामुळे राज्याचा विकास होतो आहे. जर अशीच वीज जैतापूर अणूप्रकल्पातून उपलब्ध होणार असेल तर त्याला आपल्या पक्षाचा पाठिंबाच असेल. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा असल्याने आमची सरकारला सहकार्याचीच भूमिका राहील. उलट जे सरकारमध्ये सामील आहेत त्यांनी विरोध करणे ही गोष्ट चुकीची
आहे. एकीकडे राज्यात आणि केंद्रात सत्तेत राहायचे आणि दुसरीकडे सरकारलाच विरोध करायचा, ही गोष्ट चुकीची असल्याचे सांगत सेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे मग विरोध करावा, असे पवार यांनी सांगितले.(प्रतिनिधी)