सावानात लवकरच धडाडणार ‘कलायज्ञ’
By Admin | Updated: July 27, 2016 00:11 IST2016-07-27T00:07:44+5:302016-07-27T00:11:36+5:30
नवा उपक्रम : शहरातील निरनिराळ्या कलावंतांना मिळणार व्यासपीठ

सावानात लवकरच धडाडणार ‘कलायज्ञ’
नाशिक : शतकोत्तर अमृतमहोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आता लवकरच ‘सावाना कलायज्ञ’ हा नवा उपक्रम सुरू केला जाणार आहे. ‘पसा नाट्ययज्ञ’च्या धर्तीवरील या उपक्रमाच्या निमित्ताने शहरातील निरनिराळ्या क्षेत्रांतील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकणार आहे.
शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त सावानाच्या वतीने अनेकविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या वर्षी शहरातील रंगकर्मींना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘पसा नाट्ययज्ञ’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. तो यंदाच्या वर्षीही धडाडतो आहे. बारा नाट्यसंस्थांनी दर महिन्याला एकापाठोपाठ एक याप्रकारे आपली नाटके सादर करावीत, त्यासाठी सावाना नाममात्र भाड्यात पसा नाट्यगृह उपलब्ध करून देईल, नाटकाच्या तिकीटविक्रीतून नाटकाचा खर्च निघेल, कलावंत व रसिकांना नाट्यानंद घेता येईल, अशी ‘नाट्ययज्ञ’ची योजना आहे. याच धर्तीवर आता ‘सावाना कलायज्ञ’ नावाचा उपक्रम पदाधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे. नृत्य, गायन, वादन, चित्र, शिल्प आदि क्षेत्रांतील विविध कलावंतांना दर महिन्याला त्यांची कला सादर करण्यासाठी निमंत्रित करणे, त्यातून संस्थांना कलाविष्काराची संधी देणे व नाशिककरांना उत्तमोत्तम कार्यक्रमांचा लाभ देणे, असा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या उपक्रमाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. यातील नृत्य, गायन, वादन या कला कार्यक्रमांच्या रूपात रसिकांसमोर सादर करता येणाऱ्या आहेत. फक्त चित्र व शिल्पकलाविषयक कार्यक्रमांचे स्वरूप नेमके कसे ठेवावे, हे अद्याप झालेले नाही. या कलांची प्रात्यक्षिके आयोजित करून तज्ज्ञांची व्याख्याने ठेवावीत, असाही विचार सुरू आहे. उपक्रमात अनेक कलांचा समावेश करावयाचा असल्याने तो एका वर्षाऐवजी दोन वर्षांचा (२४ महिने) असावा की महिन्यात दोन कार्यक्रम ठेवावेत, याविषयी विचारविनिमय सुरू आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत या संपूर्ण उपक्रमाचे स्वरूप निश्चित होऊन त्याला प्रारंभ होईल, अशी चिन्हे आहेत. या आगळ्या उपक्रमातून नाशिककर रसिकांना नवी पर्वणी लाभणार असल्याचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी सांगितले.