सप्तशृंगगडावर घटस्थापना
By Admin | Updated: October 14, 2015 00:01 IST2015-10-13T23:59:17+5:302015-10-14T00:01:26+5:30
वणी : नवरात्रोत्सवास प्रारंभ

सप्तशृंगगडावर घटस्थापना
वणी : सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवास भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
न्यासाचे अध्यक्ष न्या. संजीव कदम, विश्वस्त जयंत जायभावे, अॅड, अविनाश भिडे, उन्मेश गायधनी, राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. रावसाहेब श्ािंदे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, भिकन वाबळे उपस्थित होते.
देवी न्यासाच्या कार्यालयापासून वाद्यवृंदांच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली. भगवतीला महावस्त्र, खण व आकर्षक दागिने परिधान करून झाल्यानंतर व साजश्रृंगारानंतर महापूजा करण्यात आली व आरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुले झाले. गडावर रात्रीपासूनच हजारो भाविकांनी हजेरी लावल्याने सकाळी साडेसातपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दिवसभरात सुमारे पन्नास हजार भाविकांनी हजेरी लावली. पंधरा हजार भाविकांनी गडावर महाप्रसादाचा लाभ घेतला. नवरात्रोत्सव काळात मोफत महाप्रसादाचे नियोजन आखण्यात आले आहे.
भाविकांच्या निवासासाठी धर्मशाळेतील दोनशे खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिण्यासाठी ठिकठिकाणी स्वच्छ व शुद्ध पाणी तसेच आरोग्य सुविधांसोबतच अनपेक्षित घटना टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, जीवरक्षक दल, सहा मेटल डिटेक्टर, बारा हॅण्डमेटल डिटेक्टर, ६५ सीसीटीव्ही कॅमेरे, शिवालय तलावावर ७५ स्वच्छता कर्मचारी, शंभर हंगामी सुरक्षारक्षक, पोलीस दलाकडून दोन पोलीस उपअधीक्षक, सात पोलीस निरीक्षक, दहा पोलीस उपनिरीक्षक, दीडशे पुरुष पोलीस, पन्नास महिला पोलीस, दोनशेदहा गृहरक्षक दलाचे जवान, तीस आरसीपी, बत्तीस एसआरडीएफ प्लाटून, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सचिन गुंजाळ यांनी दिली. (वार्ताहर)