अवनखेडचे रूप पालटले
By Admin | Updated: July 29, 2016 01:49 IST2016-07-29T01:47:15+5:302016-07-29T01:49:06+5:30
संसद ग्रामच्या वाटेवर : वायफाय अंगणवाड्या अन् हरित स्मशानभूमी

अवनखेडचे रूप पालटले
गणेश धुरी
दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून दत्तक घेतलेल्या गावाचे दीड वर्षात चांगलेच रूपडे पालटले आहे. शाळा अन् अंगणवाड्या २१ व्या शतकातील वाय-फाय यंत्रणेशी जशा जोडल्या गेल्या आहेत, तसेच आयुष्यातील अंतिम ठिकाण असलेले अमरधामही वैविध्यपूर्ण नटलेल्या वृक्षवल्लींनी बहरलेले आहे. आरोग्याची अवस्था मात्रही पडक्या इमारतीमुळे ‘मृत्युशय्येवर’ आहे. कादवा नदीकाठचे
अवनखेड गाव तसे पाहिले तर सधन संकल्पनेत मोडते. गावात आधीपासूनच अंतर्गत सीमेंट कॉँक्रीटचे रस्ते होते, त्यात आता भूमिगत गटारींची भर पडली आहे. आता विजेच्या
ताराही भूमिगत करण्याकडे ग्रामपंचायतीचा कल आहे.
खाणार नाही अन् खाऊही देणार नाही, या उक्तीने वागणारे गावचे सरपंच नरेंद्र जाधव यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा जणू विडाच उचलला आहे. त्यामुळे खाबूगिरीची सवय असलेले ग्रामसेवक गावात मात्र कार्यरत राहण्यास नकार देतात.
विनोद अहिरे नामक ग्रामसेवकाने तूर्तास त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे ठरविल्याने बहुतेक योजना अस्तित्वात येताना दिसत आहेत. बोटावर मोजण्याइतक्या असलेल्या सीसीटीव्ही लाभलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अवनखेडचा समावेश होतो. आदर्श संसद ग्राम योजनेत कायापालट होणाऱ्या या गावात आरोग्याची पायाभूत सुविधा मात्र अजूनही सलाइनवर आहे. मात्र सातत्याच्या पाठपुराव्यामुळे गावाला ९५ लाख निधीच्या नवीन उपकेंद्राची इमारत मंजूर झाली आहे. प्रत्यक्षात इमारत उभी राहण्यास मात्र अजूनही वर्षभराचा कालावधी लागेल.
गावातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी भूमिगत गटारांची सोय केली आहे. निर्मल ग्रामचा पुरस्कार लाभलेल्या या गावात घरकुलांची मात्र काहीशी अडचण झाली आहे. आधी मंजूर झालेली घरकुले पडकी झाल्याने नवीन घरकुले मंजुरीस तांत्रिक अडचण येत आहे. अखेरच्या प्रवासासाठी शहराच्या धर्तीवर ‘वैकुंठ रथ’ तयार करण्यात आलेला आहे. कादवा नदीकाठी छानसे सभामंडप उभारून घाट विकसित करण्यात आला आहे.
इंडियन आॅइलसारख्या खासगी कंपनीने सामाजिक बांधिलकी म्हणून जगदंबानगर येथे स्त्री-पुरुषांसाठी १२ युनिटचे सार्वजनिक शोैचालय उभारले आहे. मात्र त्याच्या शुभारंभाचा मुहूर्त अजून लागलेला नाही. गावात शाळा, अंगणवाड्यांसह दहा ते बारा ठिकाणी वाय-फायचे कनेक्शन सुरू करून गावाने २१ व्या शतकात झोकात पर्दापण केले आहे.