बिबटे पकडण्याची गाठली ‘शंभरी’

By Admin | Updated: July 2, 2014 00:35 IST2014-07-02T00:13:38+5:302014-07-02T00:35:57+5:30

बिबटे पकडण्याची गाठली ‘शंभरी’

'Shambhari' reached to catch a scream | बिबटे पकडण्याची गाठली ‘शंभरी’

बिबटे पकडण्याची गाठली ‘शंभरी’

 

आनंद बोरा

नाशिक
२५ मार्च २०१२ ची घटना. शहाद्याजवळ एका विहिरीत बिबट्या पडतो... त्याला वाचविण्यासाठी नाशिकमधून एक वन अधिकारी आपल्या पशुवैद्यकीय मित्राला घेऊन शहादा गाठतो. दिवसभर मोहीम राबवून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढतो. घराकडे परतताना पहाटेचे पाच वाजतात. अंथरुणावर अंग टाकत नाही, तोच फोन खणखणू लागतो. नाशिकच्या क्रांतीनगरमध्ये बिबट्या आल्याची माहिती मिळते. पुढच्या सहा तासांच्या परिश्रमांनंतर अखेर बिबट्या जेरबंद केला जातो. न थकता वन्यप्राणी वाचविणारा हा नाशिकचा ‘लेपर्ड मॅन’ म्हणजे विभागीय वन अधिकारी सुनील वाडेकर. रविवारी मध्यरात्री इंदिरानगर येथील बिबट्या पकडून त्यांनी बिबट्या पकडण्याची ‘सेंच्युरी’ साजरी केली आहे. बिबट्यांना पकडण्याचा हा बहुधा राष्ट्रीय विक्रम असावा.
वाडेकर हे मूळ घोटीचे. त्यांनी सटाणा महाविद्यालयातून बी. एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले. सन २००० मध्ये प्रादेशिक मंडळाद्वारे निवड होऊन ते वनविभागात रुजू झाले. लहानपणापासून प्राण्यांची आवड व साहसी स्वभावामुळे वनविभागात वेगळे काम करण्याची त्यांची धडपड सुरू असते. २१ फेब्रुवारी २००४ रोजी नाशिक शहरात पहिल्यांदा बिबट्या आला, तेव्हा कोणतेही प्रशिक्षण वा साधने नसल्याने हॉटेल रसोईजवळ तो बिबट्या नाहक मारला गेला. हाच प्रसंग त्यांच्या बिबटे संवर्धन मोहिमेसाठी प्रेरणादायी ठरला. आजवर त्यांनी मगर, कोल्हे, तरस, हरिण, ससे, लांडगे, माकड, मोर, साळिंदरसह फ्लेमिंगो, शराटी, गिधाड, घार आदि शेकडो प्राणी-पक्षी वाचवले आहेत. वन्यप्राण्यांना जोखीम पत्करूनच वाचवावे लागते, असे वाडेकर सांगतात. १८ एप्रिल २०१२ रोजी वणी गडाच्या पायथ्याशी असलेल्या माडाणे या गावी बिबट्याला पकडताना त्याने केलेला हल्ला वाडेकरांसाठी अविस्मरणीय क्षणच म्हणावा लागेल. वाडेकर यांनी गावागावांत बिबट्याविषयी जनजागृतीपर कार्यक्रम केले आहेत. पशुवैद्यकीय महाविद्यालयातील युवा डॉक्टरांना मायक्रो चीपचे प्रात्यक्षिकही ते देत असतात.

Web Title: 'Shambhari' reached to catch a scream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.