शालकाने केला दाजीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:34 IST2016-04-09T00:34:26+5:302016-04-09T00:34:26+5:30
अंबड येथील घटना : बहिणीचा छळ झाल्याने संताप

शालकाने केला दाजीचा खून
सिडको : बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या दाजीचा शालकाने चाकूने वार करून खून केल्याची घटना अंबड औद्योगिक वसाहतीतील कोकाकोला कंपनीजवळ गुरुवारी (दि़७) मध्यरात्री घडली़ खून झालेल्या इसमाचे नाव अमोल केवल मोरे (२२) असे असून ते सिडकोतील सावतानगरमधील रहिवासी आहेत़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित शालक राहुल केशव जमदाडे (२१, रा़ उपेंद्रनगर, सिडको) यास ताब्यात घेतले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावतानगर येथील अमोल मोरेचा संशयित राहुल जमदाडेच्या बहिणीशी विवाह झालेला होता़ विवाहापासून अमोल सतत छळ करीत असल्याची तक्रार राहुलची बहीण करीत होती़ यामुळे संतापलेल्या राहुलने गुरुवारी रात्री अमोलला बोलावून घेत दारू पाजली व रिक्षाने (एमएच १५, ईएच २७५९) कोकाकोला कंपनीच्या मोकळ्या मैदानात घेऊन गेला़ या ठिकाणी चाकूने त्याच्यावर वार करून त्याचा खून केला़