सावानाच्या विविध समित्या कागदावरच
By Admin | Updated: October 18, 2014 00:48 IST2014-10-18T00:48:11+5:302014-10-18T00:48:24+5:30
सदस्य अनभिज्ञ : बैठकाच नसल्याचे स्पष्ट

सावानाच्या विविध समित्या कागदावरच
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या केवळ कागदोपत्री व दिखावाच असून, गेल्या दोन ते चार वर्षांत या समित्यांची एकही बैठक घेण्यात आलेली नसल्याचे माहिती अधिकारान्वये उघडकीस आले आहे.
घटनेतील तरतुदीनुसार कार्यकारी मंडळाने दर पाच वर्षांनी पाच सभासदांचे सल्लागार मंडळ निवडले पाहिजे आणि या मंडळाची वर्षातून किमान एक सभा होणे आवश्यक आहे. सल्लागार मंडळाने केलेल्या सूचना या कार्यकारी मंडळाच्या सभेत विचारार्थ मांडण्यात येतात व त्यानुसार कामकाजाची दिशा ठरविली जाते. त्यानुसार मार्च २०१२ मध्ये १३ मान्यवर सभासदांची समिती स्थापन करण्यात आली तसेच सावानाने सांस्कृतिक कार्य, वस्तू संग्रहालय, ग्रंथालयशास्त्र संशोधन, गंगापूररोड शाखा समिती, अर्थ, अभ्यासिका, नाट्यगृह, बालभवन, पुस्तक मित्रमंडळ आणि कायदेशीर सल्लागार अशा तब्बल बारा समित्यांची स्थापना केली. या समित्यांवर शहरातील मान्यवरांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. या समित्यांच्या कामकाजाबाबत वाचनालयाचे आजीव सभासद हेमंत देवरे यांनी माहितीच्या अधिकारान्वये माहिती विचारली असता वाचनालयाने गेल्या दोन ते चार वर्षांत या समित्यांची एकही बैठक घेतली नसल्याचे उघडकीस आले आहे. याचाच अर्थ वाचनालयाने केवळ अहवालापुरतीच या समित्यांची स्थापना केल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, ज्या समित्यांवर मान्यवरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यातील अनेकांना त्याची माहितीच नसल्याचा दावा देवरे यांनी केला आहे.