सातबारा, फेरफार नोंदीचे काम बंद
By Admin | Updated: November 13, 2016 01:02 IST2016-11-13T00:48:36+5:302016-11-13T01:02:19+5:30
तलाठ्यांचे आंदोलन : नागरिकांचे हाल

सातबारा, फेरफार नोंदीचे काम बंद
नाशिक : तीन दिवसांपूर्वी राज्य पातळीवर धरणे आंदोलन केल्यानंतरही शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे पाहून तलाठी संघटनेने अखेर सातबारा व फेरफार नोंदीचे काम करणाऱ्या संगणकाचे डिजिटल सिग्नेचर सिस्टीम म्हणजेच संगणकाची कळच गुरुवारी तहसीलदारांना सुपूर्द केल्याने संपूर्ण राज्यात सातबारा उताऱ्याचे वितरण तसेच फेरफार नोंदीची कामे ठप्प झाली आहेत. शासन पातळीवर गेल्या दोन दिवसांत काहीच तोडगा निघालेला नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
तलाठी सजांची पुनर्रचना व मंडळ कार्यालयांची निर्मिती करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह दैनंदिन कामकाज करताना तलाठ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यात यावे यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तलाठी संघटना राज्यपातळीवर आंदोलन करीत असून, शासनाने वेळोवेळी निव्वळ आश्वासने दिली, परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ३१ आॅक्टोंबरनंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याचाच भाग म्हणून दि. ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान तलाठी संघटनांनी काळ्याफिती लावून कामकाज केले, त्यानंतर सोमवारी राज्यभर लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. शासनाने त्याची दखल न घेतल्याने दि. १० रोजी सर्व तलाठ्यांनी संगणकाची कळ तहसीलदारांकडे सुपूर्द केली आहे. सध्या सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण झाले असून, जमीनविषयक व्यवहारांच्या नोंदी म्हणजेच फेरफारदेखील संगणकावरच केले जात आहे. ही दोन्ही कामे संगणकावरच केली जात असून, ते करण्यासाठी प्रत्येक तलाठ्यास डिजिटल स्वाक्षरीची सोय संगणकातच उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता आंदोलनात तलाठ्यांनी ही सोयच तहसीलदारांकडे सोपविली आहे. त्यामुळे संगणकांवर केली जाणारी सर्व कामे ठप्प झाली आहेत.