आरोग्य विभागातील ३५ बदल्यांवर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: May 23, 2014 01:09 IST2014-05-23T00:27:28+5:302014-05-23T01:09:43+5:30
प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गासाठी मागविणार मार्गदर्शन

आरोग्य विभागातील ३५ बदल्यांवर शिक्कामोर्तब
प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गासाठी मागविणार मार्गदर्शन
नाशिक : जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांच्या कार्यवाहीत गुरुवारी (दि.२२) आरोग्य विभागातील तीन संवर्गातील ३५ कर्मचार्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गातील कर्मचार्यांची बिगर आदिवासी भागात पदेच मंजूर नसल्याने त्याबाबत शासन मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सांगितले.
रावसाहेब थोरात सभागृहात सुखदेव बनकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. आरोग्यसेवक संवर्गातील बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात ७ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आदिवासी भागातून बिगर आदिवासी भागात ११ आरोग्यसेवकांच्या बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. आरोग्य सहायिकांच्या ४ विनंती स्वरूपातील बदल्या करण्यात आल्या. प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गातील ५३ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात ५ कर्मचार्यांच्या बदल्यांची कार्यवाही अपेक्षित होती. त्यापैकी आदिवासी भागात प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या जागा मंजूर आहेत, मात्र बिगर आदिवासी भागात पदेच मंजूर नसल्याने वर्षानुवर्षे त्यांना आदिवासी भागातच सेवा कराव्या लागतात. कर्मचार्यांची अडचण होते, ही बाब बदल्यांच्या कार्यवाहीप्रसंगी समोर आल्याने याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे बनकर यांनी सांगितले. प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एकच जागा जयदर येथे रिक्त होती. त्या जागेवर गायत्री जाधव यांनी विनंती स्वरूपाची बदली मागितली. त्यांची करंजाळी येथील जागा रिक्त झाल्यावर त्या जागेवर दहिवड येथून सुरेखा चव्हाण यांनी बदली घेतली. कुळवंडी येथून दहिवडला भामरे यांनी विनंती बदली घेतली. त्यामुळे कुळवंडीची जागा रिक्त राहिली. बदल्यांच्या कार्यवाहीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, कक्ष अधिकारी रवींद्र आंधळे आदि उपस्थित होते. शुक्रवारी (दि.२३) ग्रामपंचायत विभागातील कर्मचार्यांच्या बदल्यांची कार्यवाही होणार आहे.(प्रतिनिधी)