मुद्रणालयातील कामगारांना सातवा वेतन आयोग
By Admin | Updated: May 6, 2017 23:59 IST2017-05-06T23:59:21+5:302017-05-06T23:59:36+5:30
नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला.

मुद्रणालयातील कामगारांना सातवा वेतन आयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भाचे पत्र मुद्रणालय मजदूर संघाला प्राप्त झाल्यानंतर कामगारांनी फटाके फोडून जोरदार आनंदोत्सव साजरा केला.
भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयासह देशातील नऊ मुद्रणालये २००८ मध्ये मुद्रणालय महामंडळात समाविष्ट करण्यात आले होते. सहावा वेतन आयोग मिळविल्यानंतर महामंडळाकडून आयडीए-पे-स्केल लागू करण्यात येणार होते.
मात्र महामंडळाने कामगारांना आयडीए-पे-स्केल लागू न केल्याने मुद्रणालय कामगार केंद्रीय कामगार असून, त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी मुद्रणालय मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे व इतर मुद्रणालयातील कामगार नेत्यांनी लावून धरली होती.
गेल्या १६ मार्च रोजी महामंडळाच्या व्यवस्थापनाबरोबर झालेल्या बैठकीत मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सातवा वेतन आयोग मिळण्याची मागणी वारंवार लावून धरल्यानंतर बैठकीत त्या मागणीला मंजुरी देण्यात आली होती.