शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी सात महिला स्पर्धेत
By Admin | Updated: February 25, 2017 01:33 IST2017-02-25T01:33:18+5:302017-02-25T01:33:32+5:30
जिल्हा परिषद : युतीसाठी सेनेकडे पर्याय खुले

शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी सात महिला स्पर्धेत
नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक २५ जागा मिळवून अध्यक्ष पदावर दावा सांगितला असून, जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला राखीव असल्याने सिन्नर तालुक्यातील चार, तर येवला तालुक्यातील तिघा महिला सदस्य या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजपाने शिवसेनेसोबत युतीची तयारी दर्शविली असली तरी शिवसेनेकडून युतीचा निर्णय मुंबईहून होण्याची शक्यता आहे. तूर्तास शिवसेनेने युतीसाठी कॉँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष यांचे पर्याय ठेवले असून, भाजपासोबत युतीचा निर्णय झालाच, तर शिवसेना भाजपाकडे बहुमतापेक्षा जास्त तीन जागा असतील. त्या परिस्थितीत अध्यक्ष शिवसेनेचा तर उपाध्यक्ष भाजपाचा हा सरळ सरळ फॉर्म्युला शिवसेनेकडून ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून अध्यक्ष पदासाठी सिन्नर तालुक्यातून चार महिला निवडून आल्या असून, त्यात शीतल सांगळे, वनिता शिंदे, सुनीता सानप व वैशाली खुळे या चार महिलांचा समावेश आहे. त्यात शीतल सांगळे या आमदार राजाभाऊ वाजे यांचे खंदे सर्मथक उदय सांगळे यांच्या पत्नी आहेत, तर वैशाली खुळे या तालुकाप्रमुख दीपक खुळे यांच्या पत्नी असल्याने दोघेही अध्यक्षपदासाठी सिन्नर तालुक्यातून प्रबळ दावेदार आहेत. येवला तालुक्यातून शिवसेनेकडून राजापूर गटातून सुरेखा दराडे, नगरसूल गटातून सविता पवार व मुखेड गटातून कमल अहेर या निवडून आल्या आहेत. त्यात सुरेखा दराडे या जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या पत्नी असून, सविता पवार या माजी आमदार मारोतराव पवार यांच्या स्नुषा, तर शिवसेनेचे येवल्याचे विधानसभेचे उमेदवार संभाजीराजे पवार यांच्या नातलग आहेत. शिवसेनेकडून आता अध्यक्ष पदाची संधी सिन्नर की येवल्याला मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (प्रतिनिधी)