महिनाभरात स्वाइन फ्लूने घेतले सात बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:19 IST2017-08-04T23:38:37+5:302017-08-05T00:19:47+5:30

महिनाभरात स्वाइन फ्लूने घेतले सात बळी
नाशिक : शहरात स्वाइन फ्लूचा पुन्हा एकदा धोका वाढला असून, गेल्या महिनाभरात तब्बल सात रुग्णांचा बळी गेला आहे. त्यात नाशिक शहरातील तिघांचा समावेश आहे. दरम्यान, सात महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे ३५ जणांचा मृत्यू ओढवला आहे. बदलत्या वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा धोका वाढल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत रुग्णालयात संशयित रुग्णांचे स्क्रिनिंग केले जात आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. त्यात बाहेरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांचीही संख्या आहे. १ जानेवारी ते ४ आॅगस्ट २०१७ या कालावधीत २२३ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यात मनपा हद्दीतील ११३, तर बाहेरील ११० रुग्णांचा समावेश आहे. सात महिन्यांत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १३ मनपा हद्दीतील, तर २२ हद्दीबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. जुलै महिन्यात १४ रुग्ण मनपा हद्दीतील, तर २० रुग्ण बाहेरील होते. त्यात सहा जणांचा बळी गेला आहे. १ ते ४ आॅगस्ट या कालावधीत मनपा हद्दीतील ६, तर बाहेरील ५ रुग्णांना लागण झाली, तर मध्य प्रदेशतील सेंधवा येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या ९४ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झालेली होती. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ४३८७ संशयित रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात आले असून, त्यातील ५२२ रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी रुग्णालयांना याबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मनपा तसेच जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूचा विशेष कक्ष आणि कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येऊन रुग्णांवर उपचार केले जात आहे.