टेहरेच्या तरुणाला सात लाखांना गंडविले
By Admin | Updated: April 5, 2017 00:12 IST2017-04-05T00:12:38+5:302017-04-05T00:12:56+5:30
नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र : नाशिकच्या तिघांसह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

टेहरेच्या तरुणाला सात लाखांना गंडविले
मालेगाव : महसूल खात्यात अंशकालीन वाहनचालक म्हणून नोकरीला लावून देतो असे सांगून तालुक्यातील टेहरे येथील तरुणाकडून सात लाखांची रक्कम घेऊन नोकरीची बनावट कागदपत्र असलेले नियुक्तीपत्र देऊन फसवणूक करणाऱ्या दाभाडी येथील दोन व नाशिकचे तिघे अशा पाच जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी राजेंद्र बाळासाहेब शेवाळे (रा. टेहरे) या तरुणाने फिर्याद दिली आहे. १२ जानेवारी २०१६ ते १८ मार्च २०१७ दरम्यान दाभाडी व नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ही घटना घडली.
शेवाळे याला महसूल खात्यात अंशकालीन वाहनचालक म्हणून नोकरी लावून देतो असे दाभाडी येथील बंडू बाबूराव सूर्यवंशी व सीताराम निकम यांनी सांगितले. त्यानुसार दोघांनी नाशिक येथील विनायक शेट्टीमार्फत रवींद्र मोरे व श्रीकांत पाळदे या दोघांकडे घेऊन गेले. त्यावेळी शेट्टी याने शेवाळे याला रवींद्र मोरे हे उपजिल्हाधिकारी असून, निवड समितीचे सचिव आहेत व पाळदे हे नायब तहसीलदार आहेत व मी शेट्टी लिपिक असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. तसेच वेळोवेळी सात लाखांची रोकड त्याबदल्यात घेतली. तसेच जिल्हाधिकारी नाशिक आस्थापना शाखेकडील अंशकालीन पद कायम अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी नाशिक करिता अशी खोटी सही व शिक्का असलेले नियुक्तिपत्र तसेच विभागीय आयुक्त नाशिककडील खोटी सही व शिक्का असलेले शिफारस पत्र, सेवाबाबत अटी-शर्ती असलेले व सोबत वित्त विभाग मंत्रालय मुंबई येथील प्रधान सचिव यांच्या नावाची खोटी सही असलेले पत्र दिले. पोलिसांनी या पाचही जणांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)