हिरावाडी रोडला सात लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 02:00 AM2022-01-01T02:00:34+5:302022-01-01T02:00:54+5:30

हिरावाडी रोडवर असलेल्या शिवमनगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका सदनिकेतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ७ लाख १५ हजार रुपये किमतीचे ३१ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोकड असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

Seven lakh burglary on Hirawadi Road | हिरावाडी रोडला सात लाखांची घरफोडी

हिरावाडी रोडला सात लाखांची घरफोडी

Next
ठळक मुद्दे भरवस्तीत घडली घटना : ३१ तोळे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

पंचवटी : हिरावाडी रोडवर असलेल्या शिवमनगर येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास एका सदनिकेतील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले ७ लाख १५ हजार रुपये किमतीचे ३१ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोकड असा एकूण ७ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे कायम वर्दळ असलेल्या भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून काट्या मारुती पोलीस चौकीत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरफोडीप्रकरणी पोकार पार्क येथे राहणारे नलिन बाबूभाई पटेल यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते बुधवारी रात्री घराबाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा ब्रॅकेट लॅच व आतल्या बाजूचा लॅच तोडून घरात प्रवेश केला. घरातील दोन्ही बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटाचेही कुलूप चोरट्यांनी तोडत गळ्यातील हार, ब्रेसलेट सोन्याच्या पाटल्या, कानातील रिंग, कानातील बुटी असे एकूण जवळपास ७ लाख १५ हजार रुपये किमतीचे सुमारे ३१ तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने व पंधरा हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. पटेल घरी आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने घरफोडी झाल्याचे समजताच त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावीत, पोलीस निरीक्षक युवराज पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची पाहणी केली.

 

पोलिसांची गस्त नावालाच

हिरावाडीरोड परिसरात कधी सोनसाखळी तर कधी घरफोड्या घटना घडत असल्या तरी याकडे काट्या मारुती पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिरावाडीरोडला वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने काट्या मारुती पोलीस चौकी चर्चेत आली असून पोलीस चौकीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

Web Title: Seven lakh burglary on Hirawadi Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.