मुद्रांक अधिभारातून पालिकेला सात कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2016 00:18 IST2016-01-05T00:08:29+5:302016-01-05T00:18:21+5:30
डिसेंबरमध्ये लॉटरी : एलबीटी ७११ कोटींवर

मुद्रांक अधिभारातून पालिकेला सात कोटी
नाशिक : दरवेळी नवीन वर्षात जानेवारीमध्ये बाजारमूल्यात (रेडीरेकनर) वाढ होत असल्याने डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक नोंदणीचे व्यवहार घडत असतात. मावळत्या वर्षात डिसेंबरमध्ये एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारातून महापालिकेला तब्बल सात कोटी रुपये प्राप्त झाले असून, तुलनेत सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये जादा मिळाले आहेत. दरम्यान, २ जानेवारी २०१६ अखेर महापालिकेने ७११ कोटी रुपयांची एलबीटी वसुली केली आहे.
यंदा २०१६ मध्ये रेडीरेकनरची दरनिश्चिती मार्चनंतर करण्याची भूमिका राज्य सरकारने जाहीर केली असली तरी रेडीरेकनर दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्याच्या शक्यतेने मावळत्या वर्षात डिसेंबर महिन्यात मुद्रांक नोंदणीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे स्पष्ट झाले
आहे.
महापालिकेला एलबीटी अनुदानाबरोबरच राज्य शासनाकडून एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारही दरमहा अदा करण्यात येत आहे. महापालिकेला एप्रिल २०१५ मध्ये ५ कोटी ७ लाख, मे महिन्यात ४ कोटी ६४ लाख, जूनमध्ये ४ कोटी २२ लाख, जुलैमध्ये ४ कोटी ६१ लाख, आॅगस्टमध्ये ५ कोटी ११ लाख, सप्टेंबरमध्ये ५ कोटी ५० लाख, आॅक्टोबरमध्ये ५ कोटी १६ लाख, नोव्हेंबरमध्ये ४ कोटी ३४ लाख रुपये एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभारापोटी रक्कम शासनाकडून मिळाली होती. मात्र, डिसेंबर महिन्यात सदर रक्कम ७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे महापालिकेला सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये जादा मिळाले आहेत.