सभापतिपदासाठी सात उमेदवार

By Admin | Updated: June 27, 2014 00:09 IST2014-06-26T23:51:43+5:302014-06-27T00:09:57+5:30

सभापतिपदासाठी सात उमेदवार

Seven candidates for the post of Chairman | सभापतिपदासाठी सात उमेदवार

सभापतिपदासाठी सात उमेदवार

 

नाशिक : महापालिका स्थायी समिती सभापतिपदासाठी सात उमेदवारांनी एकूण १५ अर्ज दाखल केले आहेत. सेना, मनसे, भाजपा, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, सभापतिपदासाठी मनसेकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मनसे-भाजपाचे संख्याबळ सात असले, तरी यंदा सेनेनेदेखील सभापतिपदासाठीच्या हालचाली गतिमान केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
मनसेकडून राहुल ढिकले, शिवसेनेकडून वंदना बिरारी, सचिन मराठे, कॉँग्रेसकडून शिवाजी गांगुर्डे आणि राहुल दिवे, राष्ट्रवादीकडून राजेंद्र महाले, तर भाजपाकडून रंजना भानसी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखले केले. या सात उमेदवारांनी एकूण १५ अर्ज दाखल केले आहेत. येत्या सोमवारी (दि.३०) स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. यापूर्वी कॉँग्रेस आणि मनसेच्या वाट्याला सभापतिपद आल्याने आता कराराप्रमाणे सेनेकडून सभापतिपदावर हक्क सांगितला जात आहे, तर दुसरीकडे भाजपानेदेखील मनसे आणि सेनेच्या बळावर सभापतिपद खेचून आणण्यासाठी व्यूहरचना चालविली असल्याचे वृत्त आहे. यासाठी मुंबईतच पक्षश्रेष्ठींच्या पातळीवरून तोडगा काढण्यासाठी भाजपा आशावादी असून, सेनेची भूमिकाही यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सेना, भाजपाला सभापतिपदाची अपेक्षा असली, तरी इकडे मनसेने पुन्हा एकदा सभापतिपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. विशेष म्हणजे, या निवडणुकीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे लक्ष असल्याने मनसेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत मनसेचाच सभापती व्हावा यासाठी भाजपाचेही मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे वृत्त आहे. यासाठीची मनधरणी सुरू असली, तरी भाजपाने मात्र अद्याप कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचेही समजते. (प्रतिनिधी)

Web Title: Seven candidates for the post of Chairman