घंटागाडीच्या ठेक्याचा शनिवारी फैसला
By Admin | Updated: July 28, 2016 00:51 IST2016-07-28T00:48:56+5:302016-07-28T00:51:47+5:30
स्थायीची बैठक : अटी-शर्तींबाबत संभ्रमावस्था

घंटागाडीच्या ठेक्याचा शनिवारी फैसला
नाशिक : वादग्रस्त ठरलेल्या घंटागाडीच्या ठेक्याचा फैसला शनिवारी (दि. ३०) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत होणार असून प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावातील अटी-शर्तींबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्याने संशयकल्लोळ वाढला आहे.
प्रशासनाने घंटागाडीचा सुमारे १७६ कोटी रुपयांचा विभागनिहाय ठेक्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. सदर प्रस्तावात काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांचाही समावेश असल्याने एकूणच ठेका पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यातच प्रशासनाने स्थायी समितीला सादर केलेल्या प्रस्तावात मोजक्याच अटी-शर्तींचा समावेश केल्याने सदस्यांमध्ये संशयकल्लोळ वाढला आहे. माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घंटागाडीची निविदाप्रक्रिया राबविताना काही कठोर अटी-शर्तींचा समावेश केला होता. सुमारे ७३ अटी-शर्ती टाकण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने ठेकेदारांना स्वत: नव्या घंंटागाड्या घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु स्थायीला सादर झालेल्या प्रस्तावात नव्या घंटागाड्यांचा उल्लेख नसल्याने प्रशासनाकडून अटी-शर्ती बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांना पुन्हा घंटागाडीचा ठेका देऊ नये यासाठीही सत्ताधारी पक्षातील काही सदस्य आक्रमक झाले आहेत. त्यासाठी सभागृह नेता सुरेखा भोसले यांनी तर थेट राज ठाकरे यांनाच पत्राद्वारे साकडे घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्थायी समितीवर सादर झालेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभापती सलीम शेख यांनी शनिवारी (दि. ३०) विशेष बैठक बोलविली आहे. त्यामुळे घंटागाडीच्या ठेक्याचा नेमका काय फैसला होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)