‘सेंट फ्रान्सिस’च्या वादावर तूर्तास तोडगा
By Admin | Updated: December 6, 2015 22:35 IST2015-12-06T22:35:33+5:302015-12-06T22:35:58+5:30
‘सेंट फ्रान्सिस’च्या वादावर तूर्तास तोडगा

‘सेंट फ्रान्सिस’च्या वादावर तूर्तास तोडगा
नाशिक : शैक्षणिक शुल्क वाढीमुळे सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या तिडके कॉलनी आणि राणेनगर येथील शाळांमध्ये निर्माण झालेले वाद तूर्तास मिटले आहेत. शुल्क वाढीवर अंतिम तोडगा निघेपर्यंत पालकांनी प्रलंबित शुल्काचे धनादेश द्यावेत, असा निर्णय घेण्यात आल्याचे पालकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
शाळेच्या दोन्ही शाखांमध्ये सहामाही परीक्षेचे निकाल दरवर्षी विद्यार्थी आणि पालकांना दाखविण्यात येतात. मात्र शाळेने बेकायदेशीररीत्या शुल्क वाढ केली. ट्युशन फी आणि सत्राचे शुल्क शाळेला पालकांनी दिले. मात्र, यासंदर्भात न्यायप्रविष्ट प्रकरण झाल्यानंतर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत अॅक्टिव्हीटी फी देणार नाही, अशा भूमिकेवर पालक ठाम होते. मात्र, मुख्याध्यापक, तसेच विश्वस्त प्रतिनिधींनी मात्र पूर्ण फी भरल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या सत्रांत परीक्षेचे निकाल देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यास पालकांनी विरोध केल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तूर्तास प्रलंबित शुल्काचे धनादेश द्यावेत आणि मुख्याध्यापकांकडून त्याची पोच घ्यावी, असा निर्णय मुख्याध्यापक तारा पै, पर्यवेक्षक सी. सी. विल्सन आणि श्रीमती डायना, तसेच नरेश माळवदे, मकरंद वाघ, गुणवंत वाघ, सत्पालसिंग छाबडा, इलियास खान, संजय हिरे, विनोद फिरके, अनिस शेख, अविनाश महाजन, गणेश भोळे, किरण देशमुख, विजय पाळेकर यांच्यासह बैठकीत घेण्यात आला.