सेसच्या निधीचीही आता ‘खरेदी-विक्री’
By Admin | Updated: August 1, 2015 00:26 IST2015-08-01T00:26:01+5:302015-08-01T00:26:10+5:30
तीन तालुक्यातील सदस्यांनी दिले पत्र, इगतपुरीत गेला निधी?

सेसच्या निधीचीही आता ‘खरेदी-विक्री’
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये आणि वार्षिक अर्थसंकल्पाच्या बैठकांमधून एकेक लाखाच्या सेसवरून हमरी-तुमरी होत असतानाच पदरात पडलेल्या १० ते १२ लाखांचा सेस मात्र काही सदस्यांनी परस्पर अन्य तालुक्यात दिल्याने सदस्यांच्या या मनाच्या मोठेपणाबद्दल ‘खरेदी-विक्रीची’ चर्चा जिल्हा परिषदेत रंगली आहे.
नाशिक, सिन्नर व चांदवड तालुक्यातील काही सदस्यांनी त्यांच्या वाट्याला आलेला १० ते १२ लाखांचा सेस मनावर दगड ठेवत तसेच त्यांच्या गटात सर्वच विकासकामे झालीत,असे गृहीत धरून चक्क इगतपुरी तालुक्यात काही गटांमध्ये परस्पर दिल्याची चर्चा असून तसे पत्रच प्रशासनाकडे रवाना झाल्याचे वृत्त आहे. मागील काळात बागलाण तालुक्यात एकाच गटात चक्क अडीच कोटींच्या सेसची कामे वितरित करण्यात आल्याचा प्रकार उघड झाल्याने सभांमध्ये जोरदार हंगामा झाला होता. यथावकाश सभेतच कसमा पट्ट्यातील एका सदस्याने असा निधी मिळवायला सुद्धा ‘स्किल’ लागते, या भाषेत आरडा-ओरड करणाऱ्या सदस्यांची तोंडे बंद केली होती. अर्थात ज्या सदस्यांनी त्यांच्या गटातील निधी अन्यत्र देण्याबाबतचे पत्र दिले होते, त्यांना त्यांच्या गटातील जनतेच्या रोषास बळी पडावे लागले होते. आता वर्षभराच्या अंतरानंतर पुन्हा हाच नाट्यप्रयोग जिल्हा परिषदेत सुरू झाला असून नाशिक, सिन्नर व चांदवड तालुक्यातील मागील सत्तेतील ‘आघाडीचा’ घटक असलेल्या राजकीय पक्षांच्या काही सदस्यांनी हा निधी परस्पर इगतपुरी तालुक्यातील काही गटांना वितरित करण्यासाठी पत्र दिल्याची चर्चा असून त्यामुळे या निधी वितरणाच्या ‘खरेदी-विक्रीची’ जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा आहे. अर्थात इगतपुरी तालुक्यातूनही एका सदस्याने त्यांच्या गटातील निधी अन्य गटात वितरित करण्याबाबत गटातील विकासकामांबाबत तृप्ती मानत मनावर ‘दगड’ ठेवण्याची हिंमत केल्याची चर्चा आहे. अर्थात या सदस्याने तसे पत्र मात्र प्रशासनाला दिले नसल्याचे समजते.(प्रतिनिधी)