सेसच्या निधीची ‘घरवापसी’ सुरू
By Admin | Updated: August 2, 2015 00:17 IST2015-08-02T00:17:06+5:302015-08-02T00:17:26+5:30
प्रशासनाला पाठविले पत्र : सदस्यांकडून गटातच निधीचा वापर

सेसच्या निधीची ‘घरवापसी’ सुरू
नाशिक : आपल्या गटातील निधी अन्य तालुक्यातील गटात खर्च करण्याचा निर्णय नाशिक, चांदवड व सिन्नर तालुक्यांतील सदस्यांना महागात पडण्याची चिन्हे दिसू लागताच सदस्यांनी हा निधी त्यांच्याच गटात खर्च करण्याचा निर्णय घेतला असून, तसे उलट टपाली पत्रही प्रशासनाकडे पाठविण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.
नाशिक, सिन्नर व चांदवड तालुक्यांतील काही सदस्यांनी त्यांच्या वाट्याला आलेला १० ते १२ लाखांचा सेसचा निधी मनावर दगड ठेवत, तसेच त्यांच्या गटात सर्वच विकासकामे झालीत, असे गृहीत धरून चक्क इगतपुरी तालुक्यात काही गटांमध्ये परस्पर दिल्याची चर्चा होती. तसे पत्रच प्रशासनाकडे रवाना झाल्याचे वृत्त होते.
मागे जिल्हा परिषदेत झालेला हा नाट्यप्रयोग जिल्हा परिषदेत पुन्हा सुरू झाला असून नाशिक, सिन्नर व चांदवड तालुक्यांतील मागील सत्तेतील ‘आघाडीचा’ घटक असलेल्या राजकीय पक्षांच्या काही सदस्यांनी हा निधी परस्पर इगतपुरी तालुक्यातील काही गटांना वितरित करण्यासाठी पत्र दिल्याची चर्चा होती. त्यामुळे या निधी वितरणाच्या ‘खरेदी-विक्रीची’ जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा रंगली होती. आता यातील काही सदस्यांनी आपला निर्णय फिरवित हा निधी त्यांच्यात गटात खर्च करण्यासाठी पुन्हा पत्रप्रपंच केल्याचे समजते. (प्रतिनिधी)