साधी मनीआॅर्डर सेवा जिल्ह्यात अद्यापही ही सेवा सुरू
By Admin | Updated: April 4, 2015 01:53 IST2015-04-04T01:52:54+5:302015-04-04T01:53:20+5:30
साधी मनीआॅर्डर सेवा जिल्ह्यात अद्यापही ही सेवा सुरू

साधी मनीआॅर्डर सेवा जिल्ह्यात अद्यापही ही सेवा सुरू
नाशिक : सुमारे शंभर वर्षांची परंपरा असलेली भारतीय पोस्टाची साधी मनीआॅर्डर सेवा १ एप्रिल रोजी बंद होणार असल्याचे केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने जाहीर केले असले, तरी तसे लेखी आदेश अद्याप टपाल कार्यालयांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही ही सेवा सुरू आहे. याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त न झाल्याने पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे.
दूरसंचार क्रांतीमुळे टपाल खात्याची तारसेवा काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आली. पारंपरिक मनीआॅर्डर सुविधाही १ एप्रिलपासून बंद होणार असल्याचे फेब्रुवारीत जाहीर करण्यात आले. अनेक वर्षांपासून या सेवेशी भारतीयांची नाळ जुळलेली आहे. एका गावातून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याची ही विश्वासार्ह पद्धत असल्याने लोकांचा या सेवेला प्रचंड प्रतिसाद लाभला; मात्र गेल्या दशकात इंटरनेट व मोबाइल सेवेचा विकास झाल्यानंतर या सेवेला फारसा प्रतिसाद लाभत नव्हता. टपाल खात्याने काळानुरूप बदल करीत इलेक्ट्रॉनिक मनीआॅर्डर (ईएमओ), मोबाइल मनीआॅर्डर (एमएमओ) व इन्स्टंट मनीआॅर्डर (आयएमओ) या सेवा सुरू केल्या. परिणामी, साध्या मनीआॅर्डरचा वापर आणखी घटला. ही सेवा एप्रिलमध्ये बंद होणार असल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले होते; मात्र शासनाकडून आदेश नसल्याने ही सेवा अद्याप सुरूच असली, तरी लोकांचा प्रतिसाद मात्र अत्यल्प असल्याचे वरिष्ठ पोस्टमास्तर संजय फडके यांनी सांंगितले. (प्रतिनिधी)