महिनाभर सेवा बंद, तरीही ‘सक्तवसुली’!
By Admin | Updated: January 5, 2016 00:37 IST2016-01-05T00:32:03+5:302016-01-05T00:37:04+5:30
रिलायन्स इंटरनेट सेवेचा खेळखंडोबा सुरुच; तक्रार करूनही बिलांत सूट नाहीच

महिनाभर सेवा बंद, तरीही ‘सक्तवसुली’!
नाशिक : रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या इंटरनेटसेवेचा खेळखंडोबा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरूच असून त्यात दिवसेंदिवस नव्याने भर पडत आहे. येथील खुटवडनगर, वावरेनगर, कामटवाडा भागात महिनाभरापेक्षाही अधिक काळ रिलायन्सची इंटरनेट सेवा बंद असतानाही त्या कालावधीतील हजारो रुपयांची बिले कंपनीतर्फे नुकतीच पाठविण्यात आली आहेत. दोन महिन्यापूर्वीदेखील इंटरनेट सेवा महिनाभरापेक्षाही अधिक काळ बंद होती. त्यावेळीही ग्राहकांना पूर्ण रकमेची बिले पाठविण्यात आली होती. कंपनीकडूनच सेवा बंद असतानाही बिलवसुली करणे ही फसवणूक असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली असून अनेकांनी त्यांसदर्भात कंपनीकडे तशा तक्रारीही केल्या आहेत, मात्र अद्याप
त्याची दखल घेतली गेलेली
नाही.
तक्रार करणाऱ्या ग्राहकांना, सेवा बंद असलेल्या कालावधीतील बिल माफ करण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असले तरी यासंदर्भातली मेख अशी की, ज्या ग्राहकांनी रिलायन्सच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे (आॅनलाइन कस्टमर केअर सेंटर) आपली तक्रार अथवा विनंती नोंदवली असेल त्यांनाच फक्त बिलात सूट मिळेल, असे सांगण्यात आले. तसेच इंटरनेट सेवा बंद असल्याची तक्रार ग्राहकांनी ज्या दिवशी केली, त्या दिवसापासूनच ही सूट मिळू शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे. इंटरनेटची सेवा पूर्ववत सुरू होईल या आशेने ज्यांनी तक्रारच केली नाही, अशा ‘सोशिक’ ग्राहकांना मात्र सेवा बंद असूनही पूर्ण बिल भरावे लागेल किंवा तक्रार केल्याच्या तारखेपासून म्हणजेच मर्यादित सूट मिळेल!
रिलायन्स इंटरनेटच्या खंडित सेवेमुळे परिसरातील ग्राहक वैतागले असून ज्यांनी वेगवान इंटरनेटसेवेच्या आश्वासनावर भविष्याचे आडाखे बांधले त्यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. भलेमोठे आर्थिक नुकसान सोसून काहींना आपला ‘सायबर कॅफे’चा उद्योग गुंडाळावा लागला, तर रिलायन्स सेवेची ही गुणवत्ता पाहून काहींनी तो विचार ‘वेळीच’ सोडून दिला. सेवेत सुधारणा होत नसल्याने अनेकांनी आपली सेवाही बंद केली आहे. (प्रतिनिधी)