सारूळच्या दगड खाणीवर छापा
By Admin | Updated: January 25, 2016 23:05 IST2016-01-25T23:05:07+5:302016-01-25T23:05:39+5:30
जेसीबी, पोकलॅण्ड जप्त : महसूल विभागाची कारवाई

सारूळच्या दगड खाणीवर छापा
नाशिक : तालुक्यातील सारूळ येथील डोंगरांमध्ये भूसुरूंगाचे स्फोट घडवून दगडांचे उत्खनन व बेकायदेशीर क्रशर चालविणाऱ्या खाणीवर महसूल विभागाने अचानक छापा मारून कारवाई केली. या ठिकाणी दोन पोकलॅण्ड, जेसीबी व पाच मालट्रक यांसह भूसुरूंगाचे स्फोट घडविणारे यंत्र ताब्यात घेण्यात आले असून, वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील सारूळ, राजूर बहुला, विल्होळी, रायगडनगर आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर क्रशर चालविले जात असून, क्रशरचालकांनी थेट डोंगरांनाच लक्ष्य करून भगदाडे पाडली आहेत. गेल्या वर्षी याच खाणींमध्ये जेसीबी उलटून एक मजूर ठार झाल्याच्या घटनेनंतर महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेत सर्व क्रशर तसेच खाण मालकांवर गुन्हे दाखल केले होते. विशेष म्हणजे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या खाणींना वीज कंपनीकडून रीतसर वीजपुरवठाही करण्यात आल्याची बाब उघडकीस आली होती व त्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कालांतराने मात्र पुन्हा बेकायदा क्रशर सुरू करण्यात आले असून, त्याबाबतची खबर शनिवारी महसूल खात्याला लागताच अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, प्रभारी गौण खनिज अधिकारी गणेश राठोड, प्रांत अधिकारी मंजू लक्ष्मी, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी सर्व्हे नंबर ३६/२ या भरत नवले यांच्या मालकीच्या जागेवर अचानक छापा मारला. महसूलचे पथक येताच खाणीत भूसुरूंगाचे स्फोट घडविणारे तसेच पोकलॅण्ड व जेसीबीच्या चालकांनी घटनास्थळाहून धूम ठोकली. सारूळ व परिसरातील डोंगरांमध्ये भूसुरूंगाचे स्फोट घडवून दगडाचे उत्खनन केले जात आहे व याच ठिकाणी क्रशर चालवून खडी तयार केली जाते. घटनास्थळी दोन पोकलॅण्ड, दोन जेसीबी, पाच मालट्रक व स्फोट घडविणारे यंत्र सापडले. या घटनेनंतर वाडीवऱ्हे पोलिसांना खबर देण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला.