बिबट्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी
By Admin | Updated: July 15, 2014 00:49 IST2014-07-14T22:36:59+5:302014-07-15T00:49:03+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी
चांदवड : तालुक्यातील राहुड व नांदूरटेक रस्त्यावरील एका खोंडाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात ३५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करून त्यास अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी राहुड-नांदूरटेक रस्त्यावरील शेतात भारत अर्जुन पवार (३५) हा जनावरांना खोंड कापण्यासाठी गेला असता अचानक खोंडाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला. त्याच्या मानेला व कानाला जबर दुखापत झाली आहे. याच वेळी पुंजाराम पवार यांनी फावड्याने बिबट्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी तातडीने परिसर पिंजून काढला;
मात्र आरडाओरड झाल्याने
बिबट्या पळून गेला. डोंगरदऱ्यामधून पाण्याच्या शोधासाठी आता
बिबट्या रस्त्यावर येत असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित
या बिबट्याचा बंदोबस्त करावा,
अशी मागणी राहुड, नांदूरटेक, वडबारे, चिंचबारी, राजदेरवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी केली असून, या भागात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे. (वार्ताहर)