मालेगाव महापालिकेच्या स्वच्छतापत्रकात गंभीर चुका
By Admin | Updated: October 28, 2014 00:23 IST2014-10-27T23:39:58+5:302014-10-28T00:23:02+5:30
दुर्लक्ष : आरोग्य विभागाकडून मराठीची ऐशीतैशी

मालेगाव महापालिकेच्या स्वच्छतापत्रकात गंभीर चुका
मालेगाव कॅम्प : मालेगाव
महानगरपालिकेतर्फे छापण्यात आलेल्या साफसफाईबाबतच्या आवाहन पत्रकात असंख्य चुका असून, या पत्रकाच्या शीर्षकातच ‘नागरिक’ऐवजी ‘पागरीक’ असे छापण्यात आले आहे. अनेक गंभीर चुका करूनही मनपाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी मुद्रणदोष सांगत जबाबदारी टाळली आहे.
शहरात महानगरपालिकेतर्फे डेंग्यूसद्श किटकजन्य रोगप्रतिबंधक उपाययोजनेसंदर्भात नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबतचे पत्रके घरोघरी पोहोचले; परंतु या मराठी भाषेतील पत्रकात मराठी भाषेची ऐशीतैशी केली आहे. पत्रकातील मोठ्या अक्षरातील शीर्षकामध्ये ‘नागरिकांना’ जाहीर आवाहन या ऐवजी ‘पागरीकांना’ असे म्हटले आहे. त्याचपाठोपाठ इतर मुद्द्यांमध्ये ‘रोग नियंत्रणासाठी’ याऐवजी ‘नियंत्रणासाणी’ तर ‘काळजी’च्या जागेवर ‘काघजी’, ‘अगरबत्ती’ या शब्दाचे रूपांतर ‘अगरपत्ती’ असे केले.
‘कर्मचारी’ शब्दाचे ‘कर्मजारी’ असे केले तर ‘साधावाचे’ ‘साझवा’, पाणीसाठेचे काणीसाठे व ‘भांडे’ऐवजी ‘भंड्या’ असे मिश्कील नावे टाकून शहरवासीयांची करमणूकच केली आहे.
शहरात दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध वृत्तपत्रांमध्ये ही पत्रके टाकण्यात येऊन घरोघरी पोहोचली; परंतु पत्रके वाचल्यानंतर अनेकांची करमणूकच झाली. ऐन सणाच्या दिवसात शुभेच्छा संदेशासोबत महापालिकेच्या पत्रकांचा फोटो भ्रमणध्वनी, व्हॉट्सअॅप व फेसबुकवर टाकले व महापालिकेचा कर्तव्यदक्षपणा नागरिकांना नजरेत आणून दिला. ही पत्रके ज्या ठिकाणी छपाई करण्यात आली तेथे साधी मराठी शब्दांचे मुद्रणशोधन (प्रूफरिडिंग) झाली नसल्याचे दिसून आले. (वार्ताहर)