अपघातांची मालिका : धोकेदायक वळणामुळे तिघे ठार, अनेक जखमी

By Admin | Updated: October 27, 2014 23:29 IST2014-10-27T23:29:02+5:302014-10-27T23:29:19+5:30

संतप्त पाथरेकरांचा रास्ता रोको

Series of Accidents: Three killed, many injured due to dreadful turn | अपघातांची मालिका : धोकेदायक वळणामुळे तिघे ठार, अनेक जखमी

अपघातांची मालिका : धोकेदायक वळणामुळे तिघे ठार, अनेक जखमी

पाथरे : सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पाथरे गावाजवळ धोकादायक वळण असून, या वळणावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. गेल्या दोन दिवसांत या वळणावर चार अपघात झाले असून, त्यात तीन जण ठार, तर अनेकजण जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी सिन्नर-शिर्डी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
गेल्या अडीच वर्षापूर्वी सिन्नर ते वावी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. वावीपासून पुढे उर्वरित शिर्डीच्या दिशेने नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंतच्या राहिलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम दुसऱ्या टप्प्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले आहे. सदर रस्ता रुंदीकरणाच्या वेळी पाथरे गावाजवळील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अगोदर असलेल्या वळणापेक्षा रस्ता रुंदीकरणादरम्यान झालेले वळण आणखीणच धोकादायक झाले आहे. याठिकाणी असलेल्या पुलाचे व रुंदीकरणाचे काम गेल्या काही दिवसांपूर्वीच पूर्ण होऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला आहे. तेव्हापासून या वळणावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे.
अगोदरपेक्षा रस्ता चांगला व रूंद झाल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर असलेले वळण वाहकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वळण असल्याबाबतचे कोणतेही फलक याठिकाणी नाही. याशिवाय या वळणावर रस्त्याच्या कडेला सुमारे २० फूट खोल खड्डा निर्माण झाला असून, याठिकाणी मोठ-मोठे दगड पडलेले आहेत. अनेक दुचाकींचे या वळणावर अपघात होऊन याठिकाणी असलेले दगड त्यांना गंभीर जखमी करीत आहेत. रात्री व पहाटेच्या वेळी सदर वळण वाहनचालकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात जात आहेत. याठिकाणी दुचाकीचे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात वाहने कोसळून अनेकांना अपंगत्व येत आहे. रविवारी याठिकाणी कार उलटून झालेल्या अपघातात पिता-पुत्र ठार झाले. तर सोमवारी पहाटे उल्हासनगर (ठाणे) येथील युवकांची पल्सर (क्र. एम.एच.०५ सी. डी.११६५) दुचाकीचा या वळणावर अपघात झाला. त्यात रोशन उत्तम खोबंळे (२१) या युवकाला प्राण गमवावा लागला. त्यापूर्वी पहाटे याच वळणावर अपघात होऊन अन्य दोन युवक गंभीर जखमी झाले. या वळणावर दोन दिवसात चार अपघात झाल्याने संतप्त ग्रामस्थांसह शेतकरी संघटनेने सकाळी रास्ता रोको आंदोलन केले.
तत्पूर्वी या वळणावर अपघाताचे प्रमाण वाढू लागल्यानंतर शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधितांना याबाबतचे निवेदन दिले होते. सोमवारी पहाटे दोन अपघात झाल्यानंतर शेतकरी संघटना व ग्रामस्थ संतप्त झाले. शेतकरी संघटनेचे मच्छिंद्र चिने, नामदेव चिने, प्रकाश दवंगे, अमोल दवंगे, सोमनाथ घोलप, हेमंत चिने, बाळासाहेब गुंजाळ, सोमनाथ चिने, भरत गुंजाळ, नवनाथ खांडगे, अंकुश गुंजाळ, रवि चिने, योगेश चिने, अरुण नरोडे यांच्यासह ग्रामस्थांनी याठिकाणी रास्ता रोको केला.
वावी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलनकर्त्यांची समजूत घातली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सदर वळणावर मार्गदर्शक सूचना फलक लावण्यात यावे, वळणावर रस्त्याच्या कडेला पडलेले मोठ-मोठे दगड उचलून घेण्यात यावे, रस्त्याच्या कडेला असलेला मोठा खड्डा बुजविण्यात यावा, रस्त्याच्या कडेला लोखंडी खांब बसवून रेडियम लावण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. येत्या चार दिवसात अपघात रोखण्यासाठी वरील उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Series of Accidents: Three killed, many injured due to dreadful turn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.