तारवालानगरला अपघातांची मालिका
By Admin | Updated: February 3, 2016 22:38 IST2016-02-03T22:37:25+5:302016-02-03T22:38:41+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : दिवसाआड घडताय अपघात

तारवालानगरला अपघातांची मालिका
पंचवटी : दिंडोरीरोडवरील रस्त्यांचे रुंदीकरण झाले असले तरी सध्या या रस्त्यांवर वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. तारवालानगर चौफुलीवर अपघातांची मालिका सुरू असली तरी या अपघातांवर नियंत्रण बसावे यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दिवसाआड घडणाऱ्या अपघातात कधी वाहनांचे नुकसान, तर कधी वाहनधारक जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने या अपघाताच्या मालिकांना ब्रेक कधी लागणार, असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
तारवालानगर चौफुलीवर प्रशासनाच्या वतीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे. याशिवाय वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलीसही नेमण्यात आलेले आहेत. वाहतूक पोलीस तर केवळ रस्त्याच्या कडेला झाडाखाली सावलीत थांबतात. तेच जर वाहतुकीच्या रस्त्यावर थांबले तर अपघातांना आळा बसेल. याशिवाय सिग्नल चालू असताना अनेक बेशिस्त वाहनधारक सिग्नलकडे दुर्लक्ष करून वाहने भरधाव वेगाने नेतात व अपघात घडतात. कधी चारचाकी दुभाजकाला जाऊन धडकतात तर कधी चारचाकीवर दुसऱ्या चारचाकी येऊन धडकतात, असे वारंवार घडत असल्याने अपघातांची मालिका ही सुरूच आहे. तारवालानगर चौफुली असल्याने या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी गतिरोधक अत्यंत गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे गतिरोधक टाकावेत यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावादेखील केलेला आहे. मात्र प्रशासन गांभीर्याने दखल घेतच नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढतच आहे.
या तारवालानगर परिसरातील रस्त्यावर सिग्नल, तसेच दुभाजकावरच वाहने येऊन आदळत असल्याने प्रशासनाचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार घडणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास व प्रशासनाने गतिरोधक बसविल्यास अपघातांवर निश्चितच नियंत्रण बसू शकते, असे परिसरातील नागरिकांकडून सांगितले जात आहे. (वार्ताहर)