ज्येष्ठ नागरिकांनी लुटला सहलीचा आनंद
By Admin | Updated: August 14, 2016 00:44 IST2016-08-14T00:34:00+5:302016-08-14T00:44:05+5:30
ज्येष्ठ नागरिकांनी लुटला सहलीचा आनंद

ज्येष्ठ नागरिकांनी लुटला सहलीचा आनंद
येवला : येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांची चांदवड, मांगीतुंगी, सटाणा, सप्तशृंगगड अशी धार्मिक सहल बुधवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली. डोंगरदऱ्यांचा निसर्गरम्य परिसर व श्रावण महिन्यातील ऊन-पावसाचा खेळ अशा प्रफुल्लित वातावरणात सर्व ज्येष्ठ सदस्यांनी आपले वय विसरून सहलीचा आनंद लुटला.
चांदवड येथील निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या श्री सिद्धिविनायक व रेणुका मातेच्या दर्शनाने सहलीस सुरुवात झाली. त्यानंतर सटाणा येथील श्री देवमामलेदारांचे दर्शन घेतले. यावेळी सटाणा येथील श्री देवमामलेदार ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी सदस्यांनी सहलीतील सदस्यांचे सत्कार करून स्वागत केले. सटाणा येथील भांगडिया परिवारातर्फे आयोजित अल्पोपहार व पाहुणचार स्वीकारून सहल श्रीक्षेत्र मांगीतुंगीकडे मार्गस्थ झाली.
मांगीतुंगी येथील १०८ फूट उंच असलेले वृषभदेवाची दर्शन घेऊन तेथील निसर्गसौंदर्याचा सर्वांनी आनंद लुटला. दुुपारचे जेवण व
थोडी विश्रांती घेऊन सहल सप्तशृंगगडावर येऊन आदिमायेचे दर्शन घेतले.
सहलीत सर्व सदस्य प्रापंचिक चिंता, तणाव विसरून हास्यविनोदात सहलीत पुरेपूर रममान झाले होते. सप्तशृंगगडावर छोटेखाणी सत्कार समारंभात संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, माजी अध्यक्ष श्यामसुंदर काबरा, उपाध्यक्ष दिगंबर कुलकर्णी, खराडे, जीवन गुप्ता, तुकाराम पवार यांचा सत्कार संघातील सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. सहल यशस्वीतेसाठी अरुण गुजराथी, अशोक जाधव, राजेंद्र आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले. निंबा वाणी यांनी सहलीत तयार केलेले काव्य ऐकून सहल परतीच्या मार्गाने मार्गस्थ झाली.(वार्ताहर)