इंदिरानगर बोगद्यासाठी ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर
By Admin | Updated: November 18, 2015 22:24 IST2015-11-18T22:23:02+5:302015-11-18T22:24:38+5:30
राजकीय परिणाम : लोकप्रतिनिधी अडचणीत

इंदिरानगर बोगद्यासाठी ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर
इंदिरानगर : इंदिरानगर येथील बोगदा बंद करण्यास सर्वपक्षीय विरोधानंतरही त्याची पोलीस प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्याने बोगद्याअभावी त्रास सहन करावा लागत असलेल्या इंदिरानगर व गोविंदनगर येथील ज्येष्ठ नागरिकांनीच आता याकामी पुढाकार घेत पोलीस आयुक्तांना साकडे घालण्याचे ठरविले असून, त्यानंतरही हा प्रश्न न सुटल्यास राजकीय पातळीवर प्रश्न हाताळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेची निवडणूक वर्ष-सव्वा वर्षावर येऊन ठेपल्याने इंदिरानगरचा बोगदा बंद करण्याचा प्रश्न निवडणूक प्रचाराचा मुद्दा करण्याचे व त्यावर ठोस निर्णय घेणाऱ्या राजकीय पक्षालाच सहकार्य करण्याची भाषा आता इंदिरानगर, गोविंदनगरच्या ज्येष्ठ नागरिकांनी सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पोलीस यंत्रणेने कोणतीही पूर्वसूचना न देता बोगदा बंद केल्याने इंदिरानगर-गोविंदनगरची संपर्क यंत्रणा ठप्प झाली आहे. वाहनचालकांना उड्डाणपुलाला वळसा घालून दोन्ही बाजूला ये-जा करावी लागत आहे; त्यातून वेळ व इंधन वाया जात असल्याची तक्रार आहे.
हे सर्व करूनही बोगद्यातील वाहतुकीचा प्रश्न सुटला तर ठीक आहे, अन्यथा महापालिका निवडणुकीत मते मागण्यासाठी येणाऱ्या राजकीय पक्ष व त्यांच्या प्रमुखांना बोगद्याच्या विषयावर प्रश्न विचारून नागरिकांच्या भावनांशी सहमत असणाऱ्यांनाच मदत करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना बोगद्याचा प्रश्न विद्यमान लोकप्रतिनिधींच्या राजकीय भवितव्यावर परिणामकारक ठरू शकण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)