जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकारांना मिळणार लवकरच मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:17+5:302021-02-12T04:14:17+5:30

नाशिक : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून अ,ब,क आणि ड श्रेणीनुसार कलाकार मानधन दिले जाते. हे मानधन समितीअभावी ...

Senior artists of the district will soon get honorarium | जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकारांना मिळणार लवकरच मानधन

जिल्ह्यातील ज्येष्ठ कलाकारांना मिळणार लवकरच मानधन

नाशिक : राज्यातील ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून अ,ब,क आणि ड श्रेणीनुसार कलाकार मानधन दिले जाते. हे मानधन समितीअभावी तसेच कोरोनामुळे वितरित करण्यात आलेले नाही. मात्र, नाशिकमध्ये समिती गठित होण्यासह या समितीची पहिली बैठकदेखील नुकतीच पार पडली असून समितीकडे २२५ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून निवड होऊन प्रलंबित राहिलेल्या ज्येष्ठ कलाकार मानधनाचे येत्या महिना-दोन महिन्यातच पुन्हा वितरण करण्यास प्रारंभ होणार आहे.

राज्य शासन ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या पात्रता श्रेणीनुसार ठराविक मानधन प्रदान करत असते. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना सरकारच्यावतीने मानधन देण्याची ही योजना राबवली जाते.मात्र, हे मानधन कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित ज्येष्ठ कलाकार व्यक्तींना वितरित करण्यात आलेले नाही.अनेकांना ही मानधनाची रक्कम पुरतदेखील नाही. उतारवयातील व्याधींमुळे काहींचे हे पैसे केवळ औषधपाण्यावरच खर्च होतात, पण बुडत्याला काठीचा आधार या न्यायाने हे मानधन त्यांच्या वेदनेवरची फुंकर ठरले आहे. या योजनेसाठी कलाकार निवड करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आलेली असून समिती प्रती जिल्हा शंभर कलाकारांची निवड करते.

इन्फो

महिलांनाही आरक्षण

जीवनाच्या संध्याकाळी आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधन धोरणामध्ये आता महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. प्रत्येत जिल्ह्यातून निवड करण्यात येणाऱ्या कलाकारांमध्ये ३३ टक्के महिला असाव्यात असे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांनादेखील या समितीत पुरेसा वाव मिळू शकणार आहे.

इन्फो

वेदनेवरील फुंकर

उमेदीच्या काळात सतत काम केलेल्या कलावंतांना प्रशंसेची दाद मिळते, पण रसिकांच्या टाळ्य़ा हीच शिदोरी असे मानणारे कित्येक कलावंत धनाची साठवणूक करण्यात अपयशी ठरतात. हातावर पोट असलेल्या कित्येक कलाकारांना तर साठवणूक करण्याएवढा पैसादेखील गाठीशी येत नाही. त्यामुळे आयुष्याच्या सायंकाळी उपेक्षेला सामोरे जात हलाखीचे जीवन जगण्याची वेळ येते. अशा कलावंतांसाठी राज्य सरकारतर्फे दरमहा दिले जाणारे मानधन ही वेदनेवरील फुंकर ठरते.

इन्फो

यांचा असतो समावेश

या कलावंतांमध्ये कवी, गायक, कव्वाली गायक, शाहीर, गोंधळी, समाज प्रबोधन करणारे कलावंत, पथनाट्य कलावंत, भारुडातून प्रबोधन करणारे कलाकार, भजन गायक यांच्यासह महिला कलावंतांचादेखील समावेश असतो. ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेच्या निवडप्रक्रियेला सुरुवात झालेली असून सध्या या समितीसमोर २२५ ज्येष्ठ कलाकारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मात्र, अजूनही ज्या ज्येष्ठ गरजू कलाकारांनी अर्ज केलेले नाहीत, अशांचे अर्ज जमा करुन मगच त्यातून निवड केली जाणार आहे.

इन्फो

सध्या मानधन घेत असलेल्या कलावंतांनी त्यांचे हयातीचे दाखले जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीकडे सादर करणे आवश्यक असते. तसेच ज्या कलावंतांना मानधन मंजूर असले तरी विविध कारणास्तव त्यांचे मानधन थांबले आहे. अशा कलाकारांनी कार्यालयाकडे संपर्क साधणे आवश्यक आहे. कलावंतांनी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समितीकडे किंवा जिल्हा परिषदेकडे त्यांचे म्हणणे लेखी देणे आवश्यक असते.

Web Title: Senior artists of the district will soon get honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.