सेनेने पाडले भाजपाला एकाकी
By Admin | Updated: November 21, 2015 23:32 IST2015-11-21T23:27:51+5:302015-11-21T23:32:34+5:30
आंदोलनाकडे मनसेची पाठ : राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र

सेनेने पाडले भाजपाला एकाकी
गणेश धुरी, नाशिक
पाण्यावरून जिल्ह्यातील राजकारण तापलेले असताना त्याचा अचूक फायदा भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने घेतला. आमदार अनिल कदम व राज्यमंत्री दादा भुसे यांनी आंदोलनाची धार कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पायी जाणाऱ्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना तर दादा भुसे यांनी संरक्षण देत पालकमंत्र्यांना नियोजन भवनापर्यंत पोहोचवले.
जायकवाडीत पाणी सोडल्यावरून आणि जळगावला प्रस्तावित पाणी सोडल्यावरून जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच पाणी आरक्षणाच्या बैठकीला जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन नाशिकला येणार असल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना या पक्षांनी पाणी सोडण्याला विरोध म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून पायीच जिल्हा नियोजन भवनापर्यंत जावे लागले. त्यावेळी आक्रमक शेतकऱ्यांसमोर सहकार राज्यमंत्री दादा भुसे सामोरे जात त्यांनी शेतकऱ्यांना व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शांत करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर निफाड तालुक्यातील आक्रमक शेतकऱ्यांना शांत करण्याची भूमिका आमदार अनिल कदम यांनी घेतली. दिवसभराच्या आंदोलनात नंतर केवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच पदाधिकारी उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कॉँग्रेसचे शहराध्यक्षांचा अपवाद वगळता फारसे कोणी उपस्थित नव्हते. या सर्व प्रकरणात भाजपा पक्षाचे पदाधिकारी कोठेही दिसून आले नाही. सायंकाळी चार वाजेनंतर भाजपाचे पदाधिकारी एखाद दुसऱ्याशी बोलताना दिसत होते. वास्तविक पाहता पाण्यावरून राजकारण तापलेले असताना आणि त्याचा फायदा विरोधी पक्ष उठविण्याचे दिसत असताना सत्ताधारी भाजपाने मात्र सोयीस्कररीत्या नरमाईची भूमिका घेतली. तर पालकमंत्र्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संरक्षण देत शिवसेनेने मित्रपक्ष भाजपाला जाणीवपूर्वक यश मिळविल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. (प्रतिनिधी)
मनसेचे पदाधिकारी नसल्याने आश्चर्य
पाण्यावरून जिल्ह्यातील राजकारण तापलेले असताना आणि त्याचा फायदा सत्तेत असूनही शिवसेना घेत असताना महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी मात्र या सर्व प्रकरणात पाठ फिरविल्याचे चित्र होते. मनसेचे महापौर अशोक मुर्तडक यांच्यापासून मनेसेचे पदाधिकारी शनिवारच्या सर्व प्रकरणात अनुपस्थित राहिल्याने मनसेबाबत उलटसुलट चर्चा होती. मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांची मात्र हजेरी दिसून आली.