सेनेत पराभवाचे आत्मपरीक्षण
By Admin | Updated: February 26, 2017 00:04 IST2017-02-26T00:04:26+5:302017-02-26T00:04:41+5:30
पुत्रप्रेम कारणीभूत की अति आत्मविश्वास?

सेनेत पराभवाचे आत्मपरीक्षण
नाशिक : निवडणुकीपूर्वीच स्वबळावर सत्तेची भाषा करणाऱ्या सेनेचा वारू ३५ जागांवरच रोखला गेल्याने झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून शिवसेना सावरण्याची चिन्हे तूर्त दिसत नसली तरी, हा पराभव कशामुळे झाला याचे आत्मपरीक्षण आता पक्षीय पातळीवर सुरू झाले आहे. उमेदवारी वाटपातील दोष या पराभवास कारणीभूत आहे की, निवडणुकीपूर्वी पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास नडला, असा प्रश्न सेना नेते एकमेकांना विचारू लागले आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. अन्य पक्षाच्या जवळपास दोन डझन नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्याने सेनेची तशी संख्या ४६ नगरसेवकांपर्यंत पोहोचली होती. अशातच अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवबंधन बांधल्याने पक्षाची ताकद नको तितकी वाढल्याचा साक्षात्कार स्थानिक नेत्यांना झाल्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना एक हाती सत्ता ताब्यात घेण्याचा आत्मविश्वास वाढीस लागला. परिणामी उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी होऊन बंडखोरी तर झालीच, परंतु पक्षाच्या नेत्यांनीच आपापल्या नातेवाइकांसाठी उमेदवारीचा आग्रह धरल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सेनेत गोंधळ सुरू होता. याचा फटका पक्षाला बसल्याचा अंदाज काढला जात आहे. याशिवाय पक्षात ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी देत निष्ठावंतांना डावलण्यात आल्यामुळे नाराजी पक्षाला भोवली काय? या पातळीवरही विचार सुरू आहे. मुळात नाशिकमध्ये सेनेला सत्तेची आशा निवडणुकीपूर्वीच लागून होती. दर दिवसाआड मातोश्रीवर पक्षप्रवेश झाल्यामुळे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकचा विजय गृहीत धरला व त्या हेतूनेच उद्धव ठाकरे यांची अंतिम टप्प्यात जाहीर सभेचे आयोजन करून वातावरण निर्मितीत भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ही सभाही चमत्कार करू शकली नाही. दरम्यान, पक्षानेदेखील नाशकातील सेनेचा पराभव गांभीर्याने घेतला आहे.