कोविड लसीच्या चाचणीसाठी एचसीजी मानवताची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:14 IST2021-01-23T04:14:22+5:302021-01-23T04:14:22+5:30
नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात झायडसनिर्मित कोविड-१९ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या द्वितीय ...

कोविड लसीच्या चाचणीसाठी एचसीजी मानवताची निवड
नाशिक : केंद्र शासनाच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात झायडसनिर्मित कोविड-१९ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी एचसीजी मानवता कॅन्सर हॉस्पिटलच्या द्वितीय युनिटची निवड करण्यात आली असल्याची माहिती हॉस्पिटलचे सीईओ डॉ. राज नगरकर यांनी दिली.
या लसीच्या चाचणीसाठी कुणीही व्यक्ती स्वेच्छेने सहभाग नाेंदवू शकत असल्याचे सांगितले. १८ वर्षांवरील कुणीही व्यक्ती, ज्याची कोविड टेस्ट निगेटिव्ह असावी तसेच कर्करोग रुग्ण नसावा, अशी त्यासाठी नियमावली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही डॉ. नगरकर यांनी नमूद केले. ही लस ९१ टक्के परिणामकारक असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला असून कोणतेही मोठे साइड इफेक्ट्स त्यात सध्या तरी दिसत नसल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. या चाचणी लसीसाठी तयार असलेल्या व्यक्तीस प्रथम हॉस्पिटलमध्ये येऊन कोविड-१९ आरटीपीसीआर आणि ॲण्टीबॉडीज टेस्ट करून घ्यावी लागेल. त्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीची चाचणीसाठी नोंदणी केली जाणार आहे. लसीचा एक डोस दोन इंजेक्शनद्वारे दोन्ही खांद्यावर दिला जाईल. संपूर्ण लसीकरण तीन डोस घेतल्यावर पूर्ण होईल आणि ही प्रक्रिया दोन महिने चालेल. प्रत्येक महिन्यात एक डोस घ्यायचा असून लसीकरण करून घेणाऱ्या व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये तीन वेळा यावे लागणार आहे. चाचणी मर्यादित लोकांची असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल, असेही डॉ. नगरकर यांनी सांगितले.