लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या मागील तीन वर्षांपासून दहा वर्षांपासून सातत्याने पीककर्जाची थकबाकी असलेल्या सुमारे ७३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना सुमारे ५०० कोटींच्या कर्जापोटी मालमत्तेवर बोजा चढविण्याच्या नोटिसा जिल्हा बॅँकेच्या प्रशासनाने बजावल्याचे वृत्त आहे.विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांनी सहकारी संस्थेचे सचिव तसेच बॅँकेच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन पीककर्जासह बिगर शेती कर्ज असलेल्या संबंधितांवर जप्तीच्या नोटिसा बजावण्याबरोबरच बिगर शेती कर्जापोटी तारण मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि.५) बॅँकेच्या वतीने जिल्ह्णातील मागील तीन वर्षे ते दहा वर्षांपर्यंत थकबाकीदार सुमारे ७३ हजार शेतकऱ्यांना सुमारे ५०० कोटींच्या पीककर्ज वसुलीसाठी जप्तीच्या नोटिसा बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पीककर्जाची वसुली झाल्यास बॅँकेची आर्थिक कोंडी फुटण्यास निश्चितपणे मदत होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने काही शेतकरी सभासद पीककर्जाची थकबाकी भरत नसून बिगर शेती कर्जाचीही वसुली थकली आहे. त्यामुळे अशा थकबाकीदार सभासद व शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत २० मेपर्यंत थकबाकीदार शेतकरी सभासदांनी त्यांची थकबाकी न भरल्यास त्यांच्या सातबारा उताऱ्यावर जिल्हा बॅँकेचा बोजा चढवण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
७३ हजार शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटिसा
By admin | Updated: May 6, 2017 02:06 IST