दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील सहाशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:42+5:302021-05-30T04:12:42+5:30
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्चच्या प्रारंभापासून सुमारे अडीच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यातील सुमारे सहाशेहून अधिक ...

दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील सहाशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू !
नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्चच्या प्रारंभापासून सुमारे अडीच हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यातील सुमारे सहाशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू हा व्हेंटिलेटरवरील उपचारानंतरही झाला आहे. बहुतांश वेळा रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतरदेखील काही कालावधीने त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्याने रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊनदेखील बऱ्याचवेळा रुग्ण दगावत असल्याचे बहुतांश उदाहरणांमधून दिसून येत आहे.
नाशिक शहरात सध्या शासकीय आणि खासगीत सहाशेहून अधिक व्हेंटिलेटर्स कार्यरत आहेत. त्यात सध्यादेखील जिल्ह्यात ३९९ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत, तर ५७३ नागरिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे सध्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाले असले तरी अद्यापही सुमारे चारशे रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्यानेच मृत्युसंख्येत फारशी घट आल्याचे दिसत नाही. व्हेंटिलेटर हा रुग्ण अत्यवस्थ होण्यापूर्वी लावला गेल्यास किंवा रुग्णांना उपलब्ध झाल्यास त्यांचा जीव वाचण्याची शक्यता वाढते. मात्र, रुग्ण जेव्हा अंतिम श्वास घेत असतो, त्यादिवशी कसाबसा व्हेंटिलेटर मिळाला तर केवळ त्या रुग्णाचे मरण लांबते, मात्र टळत नाही, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अनुभव आहे.
इन्फो
दररोज दोन वेळा स्वच्छता आवश्यक
व्हेंटिलेटर्सच्या ईटी ट्यूब आणि ड्युमीडिफायरची स्वच्छता दररोज किमान दोनवेळा होणे आवश्यक असते. त्याबाबतची दक्षता संबंधित रुग्णालयांमध्ये दोन भिन्न शिफ्टमध्ये काम करणाऱ्या अतिदक्षता विभागातील सफाई कर्मचाऱ्यांकडून घेतली जाते. त्यामुळे सकाळी एकदा आणि सायंकाळी दुसऱ्यांदा याप्रमाणे व्हेंटिलेटर्सच्या ईटी ट्यूब आणि ड्युमीडिफायरची स्वच्छता करण्याबाबत संबंधित रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुखांकडूनदेखील विचारणा करून खात्री करून घेणे आवश्यक असते.
इन्फो
रुग्ण दगावल्यानंतर निर्जंतुकीकरण
अनेकदा अत्यवस्थेत गेलेले रुग्ण चार-पाच दिवस व्हेंटिलेटरवर राहूूनदेखील प्राण गमावतात. कोणत्याही व्हेंटिलेटरवरील रुग्ण दगावल्यानंतर व्हेंटिलेटर आवश्यक असलेल्या रुग्णांची आणि वेटिंगवर थांबलेल्या रुग्णांची संख्यादेखील एप्रिल आणि मे महिन्यात खूप मोठी होती. मात्र, व्हेंटिलेटरवरील रुग्ण दगावल्यानंतर अन्य रुग्णांना कितीही घाई असली तरी त्वरित त्यावर दुसरा रुग्ण लावला जात नाही. त्या व्हेंटिलेटरच्या ईटी ट्यूब, ड्युमीडिफायर तसेच नाकातोंडाजवळील सर्व उपकरणे हे ऑटोक्लेव्हमध्ये निर्जंतुक करून घेतले जातात. तेवढ्या कालावधीत व्हेंटिलेटरच्या प्रत्येक बाबीचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच दुसऱ्या रुग्णाला तो व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे आवश्यक असते.
-----------
बिटको रुग्णालय
व्हेंटिलेटरवर तज्ज्ञ ऑपरेटर नाहीत. त्यामुळे फ्लोमीटरमधील पाणीदेखील बदलले जात नसल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या अपरोक्ष होणारी व्हेंटिलेटरच्या ट्यूब, व्हेंटिमास्कची स्वच्छता कितपत होते, याबाबत साशंकता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालयात सध्या ७० व्हेंटिलेटर कार्यरत असून, या व्हेंटिलेटरच्या नळ्या आणि अन्य उपकरणांच्या सफाईसाठी एक इन्क्युबेटरच वापरले जाते. दुसरे इन्क्युबेटर आणि ऑटोक्लेव्ह तर आल्यापासून रुग्णालयात तसेच पडून आहे. त्यामुळे स्वच्छतेबाबतची दक्षता घेतली जात असली तरी सातत्याचा अभाव असल्याचे बाधितांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे.
झाकीर हुसैन रुग्णालय
रुग्णालयात सध्या एकूण ३६ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. त्यातील प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र ईटी ट्यूब वापरली जाते. तर एका पेशंटच्या वापरानंतर दुसऱ्या रुग्णासाठी वापरावा लागणारा व्हेंटिमास्क त्यापूर्वी शासनाच्या निर्देशानुसार विशिष्ट सोल्युशनमध्ये स्वच्छ करून मगच रुग्णांना लावला जात असल्याचे दिसून येत आहे.
-------------------
कोविडच्या दुसऱ्या लाटेत शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर अजिबात रिक्तच रहात नाहीत, हे वास्तव आहे. त्यातही ज्या रुग्णांना खासगीतही स्वीकारले जात नाही, ज्यांची ऑक्सिजन लेव्हल ५० पेक्षाही खाली गेलेली असते, अशा रुग्णांची संख्यादेखील मोठी असते. सर्व प्रकारची दक्षता, उपाययोजना करूनही अनेकदा असे रुग्ण उपचारांना काहीच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. त्यामुळेच शासकीय रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरवर आलेल्यांपैकीदेखील निम्म्याहून अधिक रुग्ण जीवाला मुकतात.
डॉ. आवेश पलोड , मनपा नोडल अधिकारी
------------
ही डमी आहे.