लासलगाव : येथील नूतन विद्याप्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना रस्ता सुरक्षा अभियानात जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. आदिनाथ मोरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थीदशेतच युवकांना रस्ता सुरक्षेची माहिती होऊन त्यांच्यामार्फत समाजात जागृती व्हावी या उद्देशाने पोलीस प्रशासन आणि पुणे विद्यापीठ यांच्या वतीने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार लासलगाव महाविद्यालयाने रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ केला. वाहतुकीच्या नियमांची सर्वांना माहिती व्हावी यासाठी गावातील प्रमुख ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्य, मूकनाट्य सादरीकरण, प्लेकार्डद्वारे रॅलीतून जनजागृती, आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्याक्षिके सादर केली. तसेच रस्ता सुरक्षा विषयावर घोषवाक्य, निबंध, पोस्टर, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व चर्चासत्रात नाशिकचे परिवहन अधिकारी अतुल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी चौकात विद्यार्थी व नागरिक यांना सामूहिक रस्ता वाहतुकीची शपथ देण्यात आली.कार्यक्रमास रासयो कार्यक्रम समन्वयक डॉ. पंडित शेळके, विज्ञान शाखा अधिष्ठाता काकासाहेब मोहिते, प्राचार्य फोरम अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार निकम आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते.(वार्ताहर)---
लासलगाव महाविद्यालयाला रस्ता सुरक्षा अभियानाचा द्वितीय पुरस्कार
By admin | Updated: May 14, 2014 22:41 IST