हरणबारीचे दुसरे आवर्तन आज सुटणार
By Admin | Updated: February 18, 2017 00:41 IST2017-02-18T00:41:13+5:302017-02-18T00:41:29+5:30
दबाव : तीन दिवस अगोदरच सोडले डावा व उजव्या पोटचारीत पाणी

हरणबारीचे दुसरे आवर्तन आज सुटणार
नामपूर : हरणबारीचे दुसरे आवर्तन शनिवारी (दि. १८) सोडण्यात येणार असल्याची माहिती हरणबारी कालव्याचे शाखा अभियंता संजय पाटील यांनी दिली. गेल्या १५ दिवसांपासून मोसम खोऱ्यात शेतपिकासोबत पिण्याचा व जनावरांचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला होता. पाहिले आवर्तन सुटून दोन महिने पूर्ण झाल्याने रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांदा पिके करपू लागली होती. याबाबत बागलाणसह मालेगाव तालुक्यातील जनतेने पाण्याचे रोटेशन मिळावे म्हणून खाकुर्डीचे पवन ठाकरे, नामपूरचे माजी सरपंच सोमनाथ सोनवणे, टेभेचे सरपंच भाऊसाहेब अहिरे यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात मागणी केलेली होती.
प्रखर मागणी लक्षात घेता हरणबारी कालवा निरीक्षक समितीने बैठक घेऊन तत्काळ आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत.
सदर आवर्तन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असून, ३५० एमसीएफटी पाणी सोडले जाणार असून, किमान ५०० क्यूसेस पाणी नदीपात्रात सुरू राहील, अशी माहिती शाखा अभियंता संजय पाटील यांनी दिली आहे. हे आवर्तन सुटल्यास मोसम नदीकाठावरील शेती सिंचनासोबत पिण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे शेतकरी समाधानी दिसत आहे. (वार्ताहर)