सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:13+5:302021-04-30T04:19:13+5:30
गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, सकाळी ऊन, तर दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली आहे. बुधवारी सायंकाळी ...

सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले
गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, सकाळी ऊन, तर दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली आहे. बुधवारी सायंकाळी शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले होते. त्यानंतर २४ तासांची विश्रांती घेत गुरुवारी पुन्हा ४ वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. जोराचा वादळी वारा सुटल्यानंतर १५ ते वीस मिनिटांनी दमदारपणे पाऊस कोसळला. साधारणपणे पाऊण तास पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते, तर पावसामुळे रस्त्यावर वर्दळ मंदावली होती.
पाऊण तासानंतर पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश पुन्हा निरभ्र झाले. कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी नागरिक काहींना काही कारण काढून घराबाहेर फिरतात, मात्र गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावताच किमान तासभर रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता.
इन्फो===
सलग दुसऱ्या दिवशी वीज खंडित
बुधवारच्या दिवशी संध्याकाळी पावसाने हजेरी लावताच साधारणपणे तासभर वीजपुरवठा खंडित झाला होता. तो रात्री उशिरा पूर्ववत करण्यात आला. मात्र गुरुवारी पाऊस सुरू होताच पुन्हा चार वाजता वीजपुरवठा खंडित झाला. साधारणपणे दोन तासांपेक्षा जास्त काळ पंचवटी परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
-------
मखमलाबादरोडवर झाड कोसळले
सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मखमलाबादरोडवरील मंडलिक मळ्याकडून पेठरोडला जाणाऱ्या रस्त्यावर झाड वायरवर कोसळले. यावेळी दुचाकीवर जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला वायर गुंडाळली गेल्याने युवक गाडीवरून पडून जखमी झाला. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाड कापून बाजूला करत तुटलेल्या तारांची दुरुस्ती केली.