शेळीपालन गुंतवणूकदारांचा नाशकात शोध
By Admin | Updated: September 28, 2015 23:33 IST2015-09-28T23:32:49+5:302015-09-28T23:33:11+5:30
फसवणूक : पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा सतर्क

शेळीपालन गुंतवणूकदारांचा नाशकात शोध
नाशिक : शेळी, मेंढीपालनात गुंतवणूक केल्यास सहा वर्षांत दहापट रक्कम देण्याचे आमिष दाखवून सांगली, सातारा जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची बाब हेरून नाशिक जिल्ह्यात शेळी, मेंढी पालनात गुंतवणुकीसाठी नागरिकांना प्रोत्साहित करणाऱ्यांचा पोलिसांमार्फत शोध सुरू झाला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी बेळगावनजीकच्या (कर्नाटक) बिदर जिल्ह्यातील संतपूर पोलीस ठाण्यात या संदर्भातील गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी राज गणपतराव गायकवाड (रा. सांगली) याला अटक केली होती. जागृती अॅग्रो फुड्््स प्रा. लि. या कंपनीमार्फत ग्रामीण व शहरी भागांतील गुंतवणूकदारांना शेळी व मेंढीपालन व्यवसायामार्फत सहा वर्षांत दहापट रक्कम देण्याचे आमिष दाखविले गेले. साधारणत: पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंत शेळी व्यवसायात गुंतविण्याचे व शेळ्या, मेंढ्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून सहा वर्षांत दहापट रक्कम परत करण्याचे आमिष दाखविण्यात आले, प्रत्यक्षात गुंतवणूकदारांना त्यापासून जादा रक्कमच नव्हे, तर गुंतवलेली मुद्दलदेखील देण्यास कंपनी असमर्थ ठरल्याने या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कंपनीने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येदेखील ही योजना सुरू केल्याचे तपासात पुढे आल्याने बिदर पोलिसांच्या संदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात व शहरांमध्ये या कंपनीची माहिती गोळा केली जात आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेने त्याची गंभीर दखल घेत, प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या प्रभारींना पत्र पाठवून आपापल्या हद्दीत अशा कंपनीची कार्यालये आहेत काय असतील तर त्याची चौकशी करण्याचे आदेश देऊन नागरिकांनी अशा कंपन्यांपासून सावध रहावे, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)