सीमलेस पाइप उत्पादक संकटात
By Admin | Updated: June 26, 2015 01:32 IST2015-06-26T01:32:50+5:302015-06-26T01:32:50+5:30
सीमलेस पाइप उत्पादक संकटात

सीमलेस पाइप उत्पादक संकटात
सातपूर : चीनमधील सीमलेस पाइप उत्पादक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठ काबीज केल्यामुळे भारतातील पाइप उद्योग अडचणीत आले असून, त्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. या प्रकाराला वेळेत आवर घातला नाही तर आगामी काळात उत्पादकांच्या अडचणी वाढणार आहेत. मेक इन इंडिया संकल्पना अंमलात आणावयाची असेल तर भारत सरकारने अॅन्टी डम्पिंग पॉलिसीचा लवकरात लवकर स्वीकार करणे आवश्यक आहे, असे आवाहन सीमेलस ट्युब मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश सिन्हा यांनी सातपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. आॅईल आणि गॅस उद्योगाला पुरवठा करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून ट्यूब आणि सीमेलस पाइप बनविले जातात. भारतासह विदेशात या मालाचा पुरवठा केला जातो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सीमलेस पाइप उत्पादक उद्योग अडचणीत आलेले आहेत. कारण चीनमधील कंपन्यांनी भारतीय बाजार पेठ काबीज केली आहे. अन्य देशांनी चिनी उत्पादकांवर निर्बंध आणलेले आहेत. अन्य देशांप्रमाणेच भारत सरकारनेदेखील चीनच्या मालावर निर्बंध घालावेत. अन्यथा अशीच परिस्थिती राहिली, तर पुढील काही महिन्यांत आर्थिक परिस्थिती खालावण्याची शक्यता आहे. सीमलेस पाइप उत्पादक उद्योगांचे मुख्य ग्राहक सरकारी कारखाने ओएनजीसी, आॅईल इंडिया, आयओसीएल, एचपीसीएल, बीपीसीएल, ईआयएल, भेल आहेत. जर सरकारी उद्योगच चीनचे उत्पादन वापरत असतील भारतीय उद्योग संकटात येणारच आहेत. देशांनी चीनच्या उत्पादनावर निर्बंध घातल्यामुळे चीनची मुख्य बाजारपेठ भारतच आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिला तरच रोजगार उपलब्ध होतील, अशीही माहिती सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.