उद्या होणार अर्जांची छाननी
By Admin | Updated: March 15, 2017 01:39 IST2017-03-15T01:39:36+5:302017-03-15T01:39:48+5:30
शुक्रवारी निवडणूक कक्ष सुरू राहणार

उद्या होणार अर्जांची छाननी
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत दिवसागणिक वेगवेगळ्या घडामोडी घडत असून, मंगळवारी (दि. १४) वाचनालयातर्फे अर्ज छाननीसाठीची पूर्वीची संध्याकाळची वेळ बदलून ती सकाळी ठेवण्यात आली आहे.
अर्ज छाननीसाठी याआधी गुरुवारी (दि. १६) संध्याकाळी सहा ते आठ अशी वेळ ठेवल्याने रात्री आठनंतर हरकत घेणे शक्य नाही, तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रंगपंचमीची सुटी असल्याने हा दिवस वाया जाणार असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर वाचनालयाकडून अर्ज छाननी गुरुवारी (दि. १६) सकाळी ११ वाजेपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली.
सुधारित निवडणूक कार्यक्रम प्रत्रिकेनुसार गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून वाचनालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही छाननीप्रक्रिया होणार असून, अर्ज छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी शुक्रवारी (दि. १७) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवार (दि. १७) ते रविवार (दि. १९) सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. १७) रंगपंचमीची वाचनालयाला सुटी असली तरी वाचनालयातील निवडणूक कक्ष मात्र सुरू राहणार असल्याचे वाचनालयातर्फे सांगण्यात आले. सोमवारी (दि. २०) माघारीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पॅनल आणि त्यांच्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होईल आणि मंगळवारी सकाळी अकरा वाजता (दि. २१) चिन्ह वाटपप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्या घटनेत नमूद केल्याप्रमाणे या निवडणुकीसाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सलग पाच वर्षे, तर कार्यकारिणी मंडळासाठी सलग तीन वर्षे सभासद असणे, उमेदवारांची फेब्रुवारी २०१७ पर्यंतची वार्षिक वर्गणी भरलेली असणे यासह अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जांवर अनुुमोदक म्हणून ५१ आणि सूचक म्हणून एका सभासदाची स्वाक्षरी तर कार्यकारिणी मंडळासाठी सादर केलेल्या अर्जावर एक सूचक आणि एक अनुमोदक अशा दोन सभासदांची स्वाक्षरी असणे हे निकष पाळले जाणार आहेत. या निवडणुकीसाठी वाचनालयाचे किमान एक वर्ष सभासद असलेल्या तसेच फेब्रुवारी २०१७ पर्यंतची वार्षिक वर्गणी भरलेल्या आणि अंतिम मतदार यादीत नाव असलेल्या सभासदांना मतदान करता येणार आहे. (प्रतिनिधी)