नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्जांची छाननी
By Admin | Updated: October 9, 2015 23:45 IST2015-10-09T23:45:17+5:302015-10-09T23:45:46+5:30
१९ आॅक्टोबरपर्यंत माघार : प्रभागनिहाय झाली छाननी; माघारीनंतर होणार चित्र स्पष्ट

नगरपंचायत निवडणुकांसाठी अर्जांची छाननी
नाशिक : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची शुक्रवारी छाननी करण्यात आली़ काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्ज अवैध ठरविण्यात आले़ अनेकांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्या़ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शंकांचे निरसन करून छाननी प्रक्रिया पूर्ण केली़
चांदवडला सहा अर्ज अवैध
चांदवड : चांदवड नगरपरिषदेसाठी आज छाननीच्या दिवशी चार उमेदवारांचे सहा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आता १६४ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याची माहिती प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख, मुख्याधिकारी दिलीप मेनकर यांनी दिली.
शुक्रवारी (दि. ९) चांदवड येथील प्रशासकीय इमारतीत सकाळी ११ वाजता छाननीस प्रारंभ झाला. प्रभागनिहाय छाननी करण्यात आली. त्यात प्रभाग क्रमांक १ मध्ये अलका वर्धमान पांडे यांचा एकच सूचक असल्याने, प्रभाग ३ मध्ये एबी फॉर्म नसल्याने, प्रभाग ५ मध्ये वैशाली त्र्यंबक जाधव यांचा एबी फॉर्म नसल्याने व एकच सूचक असल्याने, प्रभाग ७ व ८ मध्ये आनंद मगन बडोदे यांचा एबी फॉर्म नसल्याने व एक सूचक असल्याने, प्रभाग ९ मध्ये संजय वसंत क्षत्रिय यांना एकच सूचक असल्याने असे चार उमेदवारांचे सहा अर्ज बाद झाले आहेत, तर आता १६४ उमेदवार आहेत. दि. १९ आॅक्टोबर ही माघारीची तारीख असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. पक्षाचे एबी फॉर्म जोडल्याने आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना, मनसे हे पक्षीय उमेदवार स्वतंत्रपणे उभे राहणार असल्याने युती व आघाडी होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
देवळ्यात एकही हरकत नाही
देवळा : देवळा नगरपंचायत निवडणुकीत अर्ज छाननीच्या दिवशी २० अर्ज अवैध ठरले. परंतु अर्ज अवैध ठरलेल्या उमेदवारांनी एकापेक्षा अधिक नामांकनपत्रे दाखल केली होती. ती वैध ठरल्याने हे उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, बहुजन समाजवादी पक्षातर्फे एक उमेदवार निवडणूक लढवित आहे. इतर पक्षांच्या उमेदवारांनी नामांकनपत्रासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविता येणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागड यांनी दिली.
छाननीच्या वेळी नामांकनपत्राबाबत एकही हरकत घेण्यात आली नाही. प्रभाग क्र. २, ३, ४, ५, ६, ७, ८, १६, १७ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवार निवडणूक लढवित आहेत. प्रभाग क्र. १० मध्ये बहुजन समाज पक्षाने उमेदवार दिला आहे. प्रभाग क्र. १, ३, ४, ५, ६, १२, १५, १६ मधील उमेदवारांनी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नसल्याने व सूचक संख्या पाचपेक्षा कमी असल्याने त्यांचे अर्ज बाद झाले. असे १२ अर्ज बाद झाले. मात्र ज्या उमेदवारांनी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नव्हता परंतु सूचक संख्या पाच होती ते अर्ज वैध ठरविण्यात आले व अपक्ष निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरले. प्रभाग क्र. ६, ७ व १२ मध्ये उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज सादर केले होते. परंतु एकच सूचक दोन्ही अर्जांवर दिल्याने यापैकी एक अर्ज बाद करण्यात आला. उर्वरित अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामुळे हे सर्व उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले. प्रभाग क्र. १५ मध्ये एका उमेदवाराने जातवैधता प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भात कोणताही पुरावा दिलेला नसल्याने तो अर्ज बाद करण्यात आला. अर्ज छाननीत २० अर्ज बाद झाल्यानंतर १७ जागांसाठी १०९ उमेदवारी अर्ज आहेत. प्रभाग क्र. १ मधून ६ उमेदवार, प्रभाग क्र. २ मधून ५, प्रभाग क्र. ३ मधून ४, प्रभाग क्र. ५ मधून ८, प्रभाग क्र. ६ मधून ११, प्रभाग क्र. ७ मधून ३, प्रभाग क्र. ८ मधून ७, प्रभाग क्र. ९ मधून ४, प्रभाग क्र. १० मधून ७, प्रभाग क्र. ११ मधून ५, प्रभाग क्र. १२ मधून १७, प्रभाग क्र. १३ मधून ७, प्रभाग क्र. १४ मधून ३, प्रभाग क्र. १५ मधून ५, प्रभाग क्र. १६ मधून ५ व प्रभाग क्र. १७ मधून ५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारांना एबी फॉर्म उपलब्ध करून दिले नसल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार पक्षचिन्हावर निवडणूक लढवतील. इतर पक्ष नेमकी काय भूमिका घेतात याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. सद्यस्थिती पाहता काही प्रभाग बिनविरोध होण्याची चिन्हे असून, उर्वरित एकत्र येऊन देवळा विकास आघाडीच्या नावाने स्वतंत्र पॅनलची निर्मिती करण्याच्या विचारात असल्याचे समजते.
निफाडला ३३ अर्ज अवैध
निफाड : नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी दाखल झालेल्या १४३ अर्जांपैकी ३३ अर्ज अवैध ठरले असून, ११0 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.
उमेदवारी अर्जांची छाननी करताना पक्षाचा एबी फॉर्म नसलेले तसेच अपक्ष उमेदवारांना पुरेसे सूचक नसलेले अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर काही उमेदवारांनी पक्षाचा आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अपक्ष अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान अवैध ठरविण्यात आले.
कळवणला सात अर्ज अवैध
कळवण: नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी ११ वाजता होऊन १७ प्रभागांतून १५६ अर्जांपैकी सात उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी प्रत्येक वॉर्डनिहाय उमेदवारांना बोलावून उपस्थितांसमोर वैध व अवैध अर्ज सांगण्यात आले. अवैध अर्ज कोणत्या कारणाने आहे याची माहिती देण्यात आली. संपूर्ण छाननीत एकाही इच्छुकाने आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे छाननीचे काम शांततेत पार पडले. या छाननी प्रक्रि येत सुरेखा बुटे, निर्मला गांगुर्डे, मनीषा जाधव, विशाल गायकवाड, अरु णा देशमुख या उमेदवारांनी पक्षीय एबी फॉर्म अर्जासोबत जोडलेले नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. मात्न या उमेदवारांचे अपक्ष फॉर्म वैध ठरले आहेत. वॉर्ड क्र मांक ७ मध्ये इच्छुक राजेंद्र पगार व वॉर्ड क्र मांक १ मध्ये इच्छुक प्रमिला पगार यांचा अर्ज तिसरे अपत्याच्या कारणावरून अवैध ठरविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी पगार दांपत्याने काही कागदपत्न सादर करून अर्ज वैध ठरविण्याची विनंती केली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश जाधव यांनी पगार दांपत्यास दि. १0 ऑक्टोबर रोजी ११ वाजता निवडणूक कार्यालयात सर्व कागदपत्नांसह सुनावणीस हजर राहण्याचे सूचित केले असल्याचे सांगितले. त्यांच्या अर्जावर शनिवारी निर्णय देण्यात येणार आहे.
पेठ येथे २४ अर्ज बाद
पेठ : नगरपंचायत निवडणूक २0१५ च्या शुक्रवारी छाननीच्या दिवशी अनेकांनी आपल्या तलवारी म्यान केल्याने अनेकांचे नामनिर्देशनपत्र शाबूत राहिले असले तरीही सूचक, अनामत, एबी फॉर्म यामुळे २४ नामनिर्देशनपत्र बाद झाले आहेत. ८१ जण आता रिंगणात राहिले असून, त्यात १९ अपक्षांचा समावेश आहे.छाननीच्या दिवशी शह देण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र ऐनवेळी सर्वांनी एकमत करून आपले प्रश्न गुलदस्त्यात ठेवल्याने सर्वांना हायसे वाटले आहे. त्यात अनेकांना तिसरे अपत्य असल्याचीही चर्चा होती. पण तलवारी म्यान झाल्याने हे गुपितच राहिले. आता निवडणुकीच्या आखाड्यात ८१ उमेदवार राहिले असून, पंचरंगी सामना आता तिरंगी व चौरंगी होणार असे चित्र दिसत आहे. दि. १९ ऑक्टोबरपर्यंत अनेक अपक्षांवर माघारीसाठी गळ घालण्यात येऊन निवडणुकीचे चित्र बदलण्याचा प्रयत्न होईल. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार असल्याचे दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १६ प्रभागांत उमेदवार दिले आहेत. त्याखालोखाल शिवसेनेने १५ प्रभागांत आपले उमेदवार दिले आहेत, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १२ प्रभागांत उमेदवार दिले असून, भाजपा ९, माकप ६, मनसे ४ प्रभागांत लढत असल्याने काही प्रभागांतच बहुरंगी लढत होणार असल्याचे दिसते.
सुरगाणा : छाननीनंतर ६८ अर्ज अवैध
सुरगाणा : सुरगाणा नगरपंचायत निवडणुकीकरिता आज झालेल्या उमेदवारी अर्ज छाननीत एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविण्यात आला, तर हरकत घेतलेल्या एका उमेदवाराचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला. यावेळी ११८ अर्जांपैकी ६८ उमेदवारी अर्ज वैध ठरले. माकपाच्या रूपाली सोमवंशी यांनी वॉर्ड क्र. ६ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता; मात्र प्रतिज्ञापत्र व शपथपत्र साक्षांकित केले नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. वॉर्ड क्र. १६ मधून नामनिर्देशन दाखल केलेले उमेदवार आनंदा चौधरी यांच्या प्रतिनिधी मंदाकिनी भोये यांनी भाजपाचे उमेदवार सुरेश गवळी यांच्याकडे शासकीय थकबाकी असल्याचे सांगून त्यांच्या नामनिर्देशनपत्रावर हरकत घेऊन त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात यावा अशी मागणी केली होती. मात्र सदर बाब न्यायप्रविष्ठ असल्याने व नगरपंचायत थकबाकीशी संबंधित नसल्याचे दिसून आल्याने हरकत फेटाळण्यात आली. दरम्यान, वॉर्ड क्र. ६ मधून माकपाच्या रूपाली सोमवंशी यांचे नामनिर्देशन अवैध ठरविले असले तरी त्यांना याबाबत जिल्हा न्यायालयात अपील करता येणार आहे.