नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील द्वितीय आणि तृतीय शाहीस्नानाच्या दरम्यानच यंदा गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने गणेशमूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविली असून, विक्रेत्यांपुढील पेच वाढणार आहे. विक्रेत्यांना खासगी जागांचा शोध घेऊन त्याठिकाणी गाळे थाटावे लागणार असून, भाविक मार्गात येणाऱ्या जागांसाठी मात्र परवानगी मिळविण्याकरिता कसरत करावी लागणार आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या पूर्वी दहा दिवस अगोदर महापालिकेकडून शहरातील सहाही विभागांत गणेशमूर्ती विक्रेत्यांना गाळे उभारणीसाठी परवानगी दिली जाते. मागील वर्षी महापालिकेने ३२ ठिकाणे निश्चित केली होती. त्यात पंचवटी विभागात सर्वाधिक १५, पूर्वमध्ये ५, पश्चिममध्ये ३, नाशिकरोडला ४, सातपूरला २ आणि सिडकोत ३ ठिकाणांचा समावेश होता. पूर्वी सारडा कन्या शाळेलगत उभारण्यात येणारे गाळे गेल्या काही वर्षांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयालगत असलेल्या जागेत दुतर्फा थाटले जात आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाचा परिसर हा शांतता क्षेत्र अर्थात सायलेन्स झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय फेरीवाला क्षेत्रांचे नियोजन करताना पोलिसांनी जिल्हा रुग्णालय परिसर ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून निश्चित केलेला आहे. शांतता क्षेत्र असतानाही गेल्या काही वर्षांपासून राजकीय संरक्षण घेऊन अनधिकृतपणे गाळे थाटले जात आहेत. मागील वर्षी अनधिकृतपणे गाळे उभारणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश तत्कालीन महापौरांनी दिले होते; परंतु त्यालाही न जुमानता विक्रेत्यांनी गाळे थाटले होते. यंदा १७ सप्टेंबरला गणेश प्रतिष्ठापणा होणार आहे. त्यापूर्वीच दहा-बारा दिवस अगोदर गणेशमूर्ती विक्रीसाठी गाळे उभारले जातील. परंतु १३ व १८ सप्टेंबरला नाशिकला सिंहस्थ शाही पर्वणी असल्याने पोलीस यंत्रणेने भाविकमार्गात येणाऱ्या अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय पर्वणीकाळात रस्त्यांवर कुठेही मंडप अथवा हातगाड्या, फेरीवाले उभे राहणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार आहे. पोलिसांनी गर्दीच्या नियंत्रणासाठी ठिकठिकाणी बंदोबस्ताचे केलेले नियोजन पाहता महापालिकेने यंदा गणेशमूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत असमर्थता दर्शविली आहे. जिल्हा रुग्णालयाबाहेरील जागेत महापालिकेने खासगीकरणातून उद्यानही विकसित केले असून, त्याठिकाणी भाविकमार्ग असल्याने कोणत्याही परिस्थितीत तेथे गाळे थाटण्यास मनाई केली आहे. डोंगरे वसतिगृह मैदानावरही महापालिकेने अंतर्गत वाहनतळ उपलब्ध करून दिल्याने तेथेही गाळे उभारण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा मूर्ती विक्रीसाठी जागा उपलब्धतेबाबत विक्रेत्यांपुढील पेच वाढणार असून, खासगी जागांचा शोध घेऊन त्याठिकाणी गाळे थाटावे लागणार आहेत. त्यातही खासगी जागा भाविकमार्गात असतील तर त्याठिकाणी व्यवसायासाठी परवानगी मिळवितानाही कसरत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
गणेशमूर्ती विक्रेत्यांपुढे पेच
By admin | Updated: August 17, 2015 00:17 IST