फेरतपासणी : औषधनिर्माण-तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना धक्का
By Admin | Updated: August 23, 2016 00:08 IST2016-08-23T00:07:13+5:302016-08-23T00:08:23+5:30
...थेट ७५ टक्क्यांपर्यंत गुणवाढ

फेरतपासणी : औषधनिर्माण-तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना धक्का
नाशिक : औषधनिर्माणशास्त्र व तंत्रनिकेतनच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या फेरतपसाणीमध्ये थेट ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत जादा गुण मिळाल्याने धक्काच बसला आहे. यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी करणारे परीक्षक अपात्र आहे की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
तंत्रशिक्षण मंडळाच्या नियमानुसार औषधनिर्माणशास्त्र व तंत्रनिकेतन शाखेच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन:तपासणी करावयाची झाल्यास केवळ दोनच विषयांच्या उत्तरपत्रिकांच्या प्रतींची मागणी करता येते. औषधनिर्माण अभ्यासक्र मासाठी प्रथम वर्षासाठी सहा लेखी व पाच प्रात्यक्षिक असे एकूण अकरा विषय आहेत. शंभरपैकी प्रत्येकी चाळीस गुण मिळाल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो.
तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षा नियमावली २०११ नुसार अकरा विषयांपैकी तीन विषय अनुत्तीर्ण असल्यास तो विद्यार्थी एटीकेटीस पात्र ठरतो, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. मात्र प्रत्यक्षात विषयाच्या नियमांतील संशयास्पद वर्णनामुळे सहा लेखी विषय असताना दोनच विषयांना सध्या एटीकेटी दिली जाते. या चुकीच्या नियमांचा फटका बसून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, लेखी व प्रात्यक्षिक मिळून तीन विषयांमध्ये विद्यार्थी अनुत्तीर्ण असले तरीदेखील विद्यार्थ्याला एटीकेटी मिळायला हवी, अशी मागणी पालक राजेश बूब यांनी केली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांनी केलेल्या अर्जानुसार उत्तरपत्रिकेच्या आलेल्या छायाप्रती व त्यानंतर आलेले निकालांची तुलना करता गुणदानामध्ये दोष असल्याचे सहज लक्षात येते. त्यामुळे परीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)