Nashik IT Company Conversion Case: नाशिकच्या आयटी क्षेत्रातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुण-तरुणींचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणणे, तरुणींचे लैंगिक शोषण करणे आणि त्यांना गोमांस खाऊ घालण्यासारखे धक्कादायक प्रकार सुरू असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ टीम लीडर्सना अटक केली असून एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणी माहिती देताना आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही असा प्रकार घडला असल्याचे म्हटले आहे.
नाशिकमधील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या कनिष्ठ महिला सहकाऱ्यांसोबत तिथले टीम लीडर्स गैरवर्तन आणि लैंगिक शोषण करत असल्याची तक्रार समोर आली होती. मात्र, पोलिसांनी जेव्हा खोलवर तपास केला, तेव्हा यामागे एक मोठे धर्मांतर रॅकेट असल्याचे दिसून आले. कंपनीतील हिंदू कर्मचाऱ्यांना नमाज पडायला लावणे, रोजे धरायला सांगणे आणि त्यांना जबरदस्तीने गोमांस खाण्यास भाग पाडले जात होते.
पीडितांची संख्या ५० पेक्षा जास्त असण्याची शक्यता
आतापर्यंत ८ मुली आणि १ मुलगा या जाचाला बळी पडल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांच्या मते पीडितांचा हा आकडा ५० च्या वर असू शकतो. एका हिंदू तरुणाला जबरदस्तीने गोमांस खाऊ घातल्याचा धक्कादायक आरोपही या तक्रारीत करण्यात आला. हे सर्व प्रकार अत्यंत कंपनीच्या आवारातच सुरू होते.
एचआर हेडवरही गुन्हा दाखल
विशेष म्हणजे, पीडित तरुणींनी या छळाबाबत कंपनीच्या महिला वरिष्ठ अधिकारी आणि एचआर विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांनी एचआर हेडवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांची आक्रमक प्रतिक्रिया
या घटनेवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "या प्रकरणाची सरकारने गंभीर दाखल घेतली असून नाशिक पोलिसांनी हा विषय शोधून काढला आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असू शकते. त्यामुळे या संदर्भात सर्व प्रकारच्या चौकशी सुरू आहेत. मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना रोजे पकडायला सांगणं. त्यांना नमाज पडायला लावणं आणि धर्मांतर करणं असे प्रकार या कंपनीत सुरू होते," असं गिरीश महाजन म्हणाले.
आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही असे प्रकार घडल्याची शक्यता
"एवढ्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. तिथल्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भात कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांभीर्याने या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पुढच्या काळात यामध्ये आणखीन काही लोकांचा सहभाग असल्याचे समोर येईल. आजूबाजूच्या कंपन्यांमध्येही असे प्रकार घडल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याची चौकशी केली पाहिजे. तसेच जे पीडीत आहेत त्यांनी पुढे यावं," असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलं.
फक्त मुलींचे नाही तर मुलांचे ही धर्मांतरण
"चार ते पाच जण मिळून मुलींना ब्लॅकमेल करत होते. नोकरीचा आमिष दाखवत तिसऱ्याच व्यक्तिकडे पाठवून त्यांना तुझे फोटो, व्हिडीओ माझ्याकडे आहेत असं सांगितलं जायचं आणि त्यांचा छळ व्हायचा. त्यांना त्यांच्या मैत्रिणीला सोबत घेऊन यायला सांगितले जायचं. हा एक रॅकेटचा प्रकार आहे त्यामुळे या संदर्भात कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात कोणालाही माफी दिली जाणार नाही. या ठिकाणी फक्त मुलींचे नाही तर मुलांचे ही धर्मांतरण करून घेण्यात आले. त्यांना पैशाचे, नोकरीचे आमिष देण्यात आलं आणि त्यांचे धर्मांतर करण्यात आलं," असेही महाजन म्हणाले.
Web Summary : A Nashik IT company faces allegations of forced conversions, sexual exploitation, and coerced beef consumption. Police arrested six individuals; victims may exceed 50. HR is also implicated. Minister Mahajan suspects similar activities in nearby companies and urges victims to come forward.
Web Summary : नासिक की एक आईटी कंपनी पर जबरन धर्मांतरण, यौन शोषण और गोमांस खाने के लिए मजबूर करने के आरोप लगे हैं। पुलिस ने छह लोगों को गिरफ्तार किया; पीड़ितों की संख्या 50 से अधिक हो सकती है। एचआर भी शामिल। मंत्री महाजन को आसपास की कंपनियों में भी ऐसी गतिविधियों का संदेह है।