लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. सध्या कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. दुसरीकडे महाविद्यालये मात्र बंदच आहेत. त्यामुळे विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला असून, महाविद्यालये सुरू केव्हा होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालक, प्राध्यापकांचे लक्ष लागून आहे.
महाविद्यालये सुरू व्हावीत, म्हणून आता विद्यार्थ्यांकडून आंदोलने सुरू झाली आहेत. सन २०२० मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव याढल्याने याचा फटका सर्वच क्षेत्रला बसला. यामधून शिक्षणक्षेत्रही सुटू शकले नाही. नाशिक जिल्ह्यात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीच्या शाळेची पहिली घंटा वजली. त्यानंतर कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू झाले. परंतु, दुसरीकडे महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत महाविद्यालयीन विद्यार्थी हे कोरोनाविषयक नियमांचे पालन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात, असे असतानाही नेमकी महाविद्यालयेच बंद का, असा प्रश्न विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयांकडून संपूर्ण शुल्क आकारले जात असतानाही ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली महाविद्यालये बंद ठेवून विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
--इन्फो--
दीड लाख विद्यार्थी प्रतीक्षेत
नाशिक जिल्ह्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांसह अन्य विद्यापीठांशी संलग्नित जवळपास २५३ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधील सुमारे एक लाख ५५ हजार विद्यार्थी महाविद्यालये सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पॉइंटर
एकूण महाविद्यालये - २३५
एकूण विद्यार्थी -१ लाख २२ हजार
शासन व महाविद्यालयीन प्रशासनाने लवकरात लवकर महाविद्यालये सुरू केली पाहिजेत.
माझ्यासारखे बरेच विद्यार्थी जे इतर शहरांमधून शिकायला आहेत, त्यांना फी भरण्यासाठी कॉलेजमध्ये बोलावले जाते; पण तासिका देण्यासाठी नाही. ऑनलाइन लेक्चर्समुळे शिक्षणाची गुणवत्ता कमी होत आहे. विद्यार्थी फक्त हजेरीसाठी आणि कॉलेज फक्त आपल्या रजिस्टर भरण्यासाठी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.
-अद्वैत जोशी, विद्यार्थी.
ऑनलाइन क्लासेसमध्ये पाहिजे तसे शिक्षण भेटत नाही. प्रत्यक्षरीत्या शिक्षणामध्ये जी मजा आहे ती ऑनलाइनमध्ये नाही. कोरोनाचा प्रादुर्भावही आता कमी होत चालला आहे. लवकरात लवकर महाविद्यालये चालू झाली पाहिजेत.
-तपस्वी गोटारणे, विद्यार्थिनी.
अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत; पण त्याचा खरंच काही फायदा तरी होत आहे का? ऑनलाइन शिक्षणात अनेक तांत्रिक अडचणी येतात व त्यामुळे विद्यार्थी हा गुणवत्तापूर्ण व उत्तम दर्जाच्या शिक्षणापासून वंचित राहतो. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, त्यामध्ये सर्व जनजीवन हे सुरळीत चालू झाले असता महाविद्यालये अद्याप बंद का? आता महाविद्यालये चालू झालीच पाहिजेत, हे विद्यार्थी हितासाठी अत्यंत गरजेची आहे.
कौस्तुभ पिले, विद्यार्थी.
मागील १० महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद आहेत. परंतु, लॉकडाऊननंतर सर्व सुरळीत सुरू झाले असताना महाविद्यालये बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. २७ जानेवारीपासून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये सुरू झाली; परंतु महाविद्यालये बंद आहेत. शासन अजूनही महाविद्यालये सुरू करण्याचा विचार करत नाही. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली होती. विद्यापीठांनीही त्यांच्या बैठकांमध्ये महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रस्ताव पारित करून राज्य शासनाला पाठवले आहेत. विद्यापीठाने दर्शवलेल्या तयारीवर देखील महाविकास आघाडी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाविद्यालये सुरू करण्याची मागणी करत आहे.
-ऐश्वर्या पाटील, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद.