शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव लालफितीतच

By Admin | Updated: September 13, 2016 01:15 IST2016-09-13T01:15:23+5:302016-09-13T01:15:33+5:30

सदस्याची नाराजी : ८९ शाळा खोल्यांचे निर्लेखन कागदावरच

School proposal proposal in rediff | शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव लालफितीतच

शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव लालफितीतच

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ३३८० प्राथमिक शाळांमधील ८९ शाळा खोल्यांच्या निर्लेखनाचे २९ प्रस्ताव कागदावरच असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. विशेष म्हणजे निर्लेखनच झालेले नसल्याने या शाळा कधीही कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
सोमवारी (दि.१२) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांना बोलावून या ८९ शाळा खोल्यांच्या २९ प्रस्तावांना नेमका अडसर कोणत्या विभागाचा आहे? अशी विचारणा केली. त्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच बांधकाम विभागाचा याला अडसर असल्याचे संबंधित काम पाहणारे कर्मचारी राजेश आहेर यांनी सांगितले. जिल्हाभरातून ओझर, अंदरसूल, दारणा सांगवीसह जिल्ह्णातील २८ शाळांमधील सुमारे ८९ शाळांच्या खोल्या निर्लेखनाचे प्रस्ताव मंजूर नसल्याची बाब उघड झाली. यावेळी शिक्षण समिती सदस्य प्रा. प्रवीण गायकवाड यांनी मागील सर्वसाधारण सभेतच आपण सर्व शाळा खोल्या निर्लेखनांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा ठराव आयत्यावेळी मांडलेला असल्याने त्यानुसार या ८९ शाळा खोल्यांच्या कामांना अद्याप निर्लेखित का केले नाही, अशी विचारणा केली. त्याचवेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी या शाळा खोल्या निर्लेखित करण्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी बाकी असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे आता पावसाळा उलटत आला तरी या गळक्या व पडक्या शाळा खोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव दोन विभागांच्या साठमारीत पडून असल्याचे चित्र आहे. याबाबत तत्काळ आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे यांना बोलावून बांधकाम विभागाचा अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने सूचना केल्या.
येत्या काही दिवसांत शाळा खोल्या निर्लेखनाची कार्यवाही मार्गी लागेल, असे अनिल लांडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: School proposal proposal in rediff