पालकांनीच उघडले शाळेचे कुलूप
By Admin | Updated: July 5, 2016 00:37 IST2016-07-04T23:06:35+5:302016-07-05T00:37:03+5:30
पिळकोस : समस्यांची दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप

पालकांनीच उघडले शाळेचे कुलूप
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील जिल्हा परिषद शाळेला ठोकण्यात आलेले कुलूप कोणीही दखल न घेतल्याने पालकांनीच उघडले. एक वर्षापासून भाषा विषयासाठी पदवीधर शिक्षक नसल्यामुळे या शाळेला पालकांकडून सोमवार, दि. २७ जून रोजी कुलूप ठोकण्यात आले होते.
शाळा बंद करून आठवडा उलटला तरीही पदवीधर शिक्षकाची नेमणूक केली गेली नाही. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनीही याची दखल न घेतल्यामुळे अनेक दिवस शाळा बंद ठेवूनही उपयोग होत नसल्याचे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहून शेवटी पालकांकडून नाइलाजास्तव शाळेचे कुलूप उघडण्यात आले व शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली.
पदवीधर शिक्षकाची या शाळेवर नेमणूक होईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषद वा पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने शाळा पूर्ववत सुरू होण्यासाठी पालकांशी व गावकऱ्यांशी चर्चा केली नाही. याउलट पालकांना सांगितले गेले की, पदवीधर शिक्षकाची नेमणूक जिल्हा परिषदेकडून केली जाईल, यात आम्ही काहीही करू शकत नसून शाळा बंद केल्याने तुमच्याच पाल्याचे नुकसान होईल.
शाळा बंद करून अनेक दिवस होऊनही याची दखल जिल्हा परिषद नाशिक, गटशिक्षण अधिकारी कळवण, गटविस्तार अधिकारी कळवण व प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख यांसह लोकप्रतिनिधीनी न घेता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी पालकांनी शाळेचे कुलूप उघडून शाळा पूर्ववत सुरू केली.
यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची शिक्षणाची सोय दुसरीकडे लावण्याचा आता निर्णय घेतला असून, दाखले काढून खासगी शाळेत पालक आपल्या पाल्यांना टाकणार असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले.
मुख्याध्यापक यांनी मागणी केली होती का हे पाहण्यासाठी शाळेचे शालेय शिक्षण समितीचे प्रोसेडिंग पाहिले असता ते प्रोसेडिंग अपूर्ण होते हे या दरम्यान निदर्शनास आले. तालुक्याच्या शिक्षण विभागालाही याची माहिती नसल्याचे तालुका पातळीवरील अधिकारी पालकांना यावेळी सांगू लागले. मग पालक ग्रामस्थ वर्षभर याबातीत निवेदन देत होते ते गेले कुठे? पालकांनी दिलेल्या निवेदनाचा तालुकास्तरावरून पाठपुरावा झाला नसल्याचा आरोप समाजसेवक श्रीधर वाघ यांनी शिक्षण विभागावर केला.
जिल्हा परिषद शाळेतून विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याशिवाय पर्याय आता पालकांपुढे नसल्यामुळे शाळा बंद करूनही शिक्षण
विभाग, लोकप्रतिनिधिनी याची दखल न घेतल्यामुळे पालकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)