शाळकरी मुलींनी घेतली रोपे दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:11 IST2021-06-05T04:11:41+5:302021-06-05T04:11:41+5:30
कोरोनामुळे शाळांना अघोषित सुटी जाहीर झाली. मागील चार महिन्यांपासून शाळांचे प्रवेशद्वार उघडलेले नाही. याकाळात शाळकरी मुले, मुली घरातच बसून ...

शाळकरी मुलींनी घेतली रोपे दत्तक
कोरोनामुळे शाळांना अघोषित सुटी जाहीर झाली. मागील चार महिन्यांपासून शाळांचे प्रवेशद्वार उघडलेले नाही. याकाळात शाळकरी मुले, मुली घरातच बसून ऑनलाइन धडे गिरवत आहेत. नवरंग कॉलनीमध्ये राहणाऱ्या अशाच काही शाळकरी मुलींना मागील महिन्यात आपल्या परिसरातील मोकळ्या भूखंडांवरील कोमजणाऱ्या रोपांना बघून त्यांच्या संवर्धनाची कल्पना सुचली. या सर्व चिमुकल्या मैत्रिणींनी एकत्र येत या भूखंडावरील लहान झाडांना प्रतीकात्मक स्वरुपात आपापली नावे दिली आणि प्रत्येकीने एक झाड दत्तक घेत त्याच्या संवर्धनाचा संकल्प सोडला अन् मग सुरु झाला सकाळ-संध्याकाळ झाडांना पाणी देत निगा राखण्याचा नित्यक्रम.
येथील मनपाच्या मोकळ्या भूखंडावर काही महिन्यांपूर्वी मनपाच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने ‘देवराई’ उपक्रमांतर्गत २०० रोपांची लागवड केली आहे. लोकसहभागातून या संस्थेकडून रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. याच भागात राहणाऱ्या ईच्छामणी दर्शन सोसायटीमधील विविध कुटुंबातील शाळकरी मैत्रिणींनी एकत्र येत वृक्ष संवर्धनाचा वसा उचलला. त्यासाठी त्यांनी थेट येथील रोपे दत्तकच घेऊन टाकली. ‘आपले झाड आपणच वाढवायचे’ असा निश्चय या चिमुकलींनी केला आहे.
---इन्फो-- ...असा आहे वृक्षप्रेमी मुलींचा ग्रुप यज्ञजा गवळी, शौर्या केदार, आराध्या पुंडे, अनन्या, स्पृहा जैन, आर्या यांच्यासह अन्य शाळकरी मुलींनी एकत्र येत आपला ग्रुप तयार केला आहे. या मुलींनी आपली नावे येथील झाडांना देऊन त्यांच्या जगविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. एरवी वृक्षारोपण करण्यासाठी अनेक हात पुढे येतात मात्र एकदा झाड लावल्यानंतर ते जगले की नाही, हे तपासण्याची तसदी अपवादानेच बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडून घेतली जाते. त्यामुळे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हे घोषवाक्य जनप्रबोधनासाठी अस्तित्वात आले. भावी पिढी झाडे लावण्यासोबतच ती जगविण्याबाबतही सजग असल्याचे या मुलींच्या ग्रुपने दाखवून दिले आहे.