मुसळधार पावसामुळे शाळा इमारत कोसळली
By Admin | Updated: September 23, 2015 23:30 IST2015-09-23T23:29:20+5:302015-09-23T23:30:09+5:30
मुसळधार पावसामुळे शाळा इमारत कोसळली

मुसळधार पावसामुळे शाळा इमारत कोसळली
सोग्रस : चांदवड तालुक्यातील कानमंडाळे, येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा बहुतेक भाग हा चोवीस तास चाललेल्या मुसळधार पावसाने जमीनदोस्त झाला. ही इमारत रात्रीच्या वेळी कोसळल्याने सुदैवाने अनर्थ टळला. अगोदरच जीर्णावस्थेत असलेली ही इमारत मुसळधार पावसात तग धरू शकली नाही. इमारत कोसळल्याने शैक्षणिक प्रक्रिया बंद पडू नये म्हणून शिक्षकांनी एकाच खोलीत दोन वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्रित बसवून शाळा सुरू ठेवली आहे.
या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी कानमंडाळे जिल्हा परिषद गटाचे सदस्य दादाभाऊ अहिरे व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामशिक्षण समिती, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी ताबडतोब बैठक घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी प्राप्त करण्याविषयी पंचायत समिती चांदवड, जिल्हा परिषद नाशिक, आमदार डॉ. राहुल अहेर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पालकमंत्री यांना निवेदन दिले. या शाळेच्या दुरुस्तीसाठी किंवा नव्याने इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध न करून दिल्यास या शाळेला कायमस्वरूपी कुलूप लावण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ अहिरे, समाधान घडोजे, बाजीराव चौधरी, निरंजन दवंगे, वसंतराव जाधव आदिंसह ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)